काल दिवसभर मुंबई आणि कोकण किनारपट्टीला तडाखा दिल्यानंतर काल रात्रीच चक्रीवादळ तौक्ते गुजरातच्या किनाऱ्यावर धडकले होते. गुजरातच्या किनाऱ्यावर धडकताना वादळाने रौद्र रुप धारण केले होते. आता वादळ सौराष्ट्रपर्यंत पोहोचले आहे.
गुजरातच्या किनाऱ्यावर लँडफॉल करतेवेळी वाऱ्याचा वेग ताशी ११५ किमी ते १२५ किमी पासून ते ताशी १४० किमी इतका भयावह झालेला होता.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार हे वादळ सध्या अहमदाबादपासून दक्षिणेला २३० किमीवर आहे. जमिनीवर आल्यानंतर या वादळाची तीव्रता कमी झाली आहे आणि आता हे वादळ खूप ‘धोकादायक वादळ’ या वर्गवारीत आले आहे. हवामानखात्याच्या अंदाजानुसार आजच्या दिवसाच्या शेवटपर्यंत हे वादळ अजून कमी होऊन जाईल.
हे ही वाचा:
इस्रोमुळे कोविडरुग्णांना प्राप्त होणार ‘श्वास’
मुंबईत अजून २४ तास पावसाची शक्यता
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची झापडं मुंबई-बारामती पुरती
देशात ३ लाखांपेक्षा कमी नवे कोरोना रुग्ण
वादळ जरी गुजरातवर गेलेलं असलं तरीही, कोकण किनारा, गुजरातचा काही भाग आणि राजस्थान या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अनेक पिकांचे, घरांचे नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तवली गेली आहे.
गुजरातला धडक दिल्यानंतर वादळाचा प्रभाव तात्काळ दिसून येऊ लागला. दुर्दैवाने या वादळात गुजरातमध्ये चार लोकांचे मृत्यु झाले. एसईओसीने दिलेल्या माहितीनुसार राजकोट, वलसाड आणि भावनगर येथे प्रत्येकी एकाचा भिंत कोसळून मृत्यु झाला, तर एक स्त्री झोपलेली असताना तिच्यावर विजेचा खांब कोसळल्याने मृत्यु झाल्याची घटना पाटण येथे घडली.
गुजरातच्या किनाऱ्यावर वादळामुळे वीज कापण्यात आली होती. गीर- सोमनाथ, अमरेली आणि भावनगर जिल्ह्यांत रात्री दहा वाजता मुसळधार पाऊस पडला. यात गीर सोमनाथमधील उना या ठिकाणी सर्वाधिक नुकसान झाले सकाळी ४ वाजेपर्यंत सुमारे १२ तासात या ठिकाणी १७५ मीमी पर्जन्यवृष्टी नोंदली गेली होती.