अरबी समुद्रात वादळाची निर्मिीती; महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा

अरबी समुद्रात वादळाची निर्मिीती; महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा

दोन दिवसांपूर्वी गुरूवारी अरबी समुद्राच्या आग्नेय भागात लक्षद्वीप भागात कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती झाली होती. त्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता वर्तवली गेली होती. त्याप्रमाणे तिथे चक्रीवादळ निर्माण झाले असून ते १८ मेच्या संध्याकाळपर्यंत ते गुजरातच्या किनारपट्टीच्या जवळ पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार संपुर्ण राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना रविवार आणि सोमवारसाठी तर पुणे जिल्ह्याला फक्त सोमवारसाठी ‘ऑरेंज अॅलर्ट’ देण्यात आला आहे. येणाऱ्या परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस काही ठिकाणी पडू शकेल, असा अंदाज आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारीही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

हे ही वाचा:

अक्षय्य तृतीयेच्या मोदींनी दिल्या शुभेच्छा

भाजपाच्या प्रभावाने करदात्यांचे कोट्यवधी रुपये वाचले

कोरोनाविरोधात भारत सरकारने काय केले? सत्य आणि गैरसमज

मुंबई असो किंवा तेल अवीव…दहशतवाद हा दहशतवाद आहे

कोकणातही शनिवारीही पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यातही शनिवारपासून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

मुंबई, ठाण्यामध्ये रविवारी पावसाचा जोर थोडा कमी असेल. मात्र सोमवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्यातदेखील शनिवारी आणि रविवारी पावसाचा जोर कमी असेल. परंतु सोमवारी घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

कोल्हापूर, सातारा येथे रविवारी आणि सोमवारी घाट परिसरामध्ये काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकेल. सांगलीमध्ये रविवारी काही ठिकाणी मुसळधार पाऊस असेल तर सोमवारपासून पावसाचा जोर कमी होईल, अशी शक्यता आहे.

मराठवाड्यातही अनेक ठिकाणी रविवारी आणि सोमवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. तर विदर्भातील पावसाचा जोर मात्र रविवारपासून थोडा वाढू शकतो. अकोला, अमरावती, बुलडाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Exit mobile version