बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फेंगल’ चक्रीवादळ शनिवार, ३० नोव्हेंबर रोजी दुपारी तामिळनाडू आणि पुद्दुचेरीजवळ धडकणार असल्याची माहिती आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, या काळात वाऱ्याचा वेग ताशी ९० किलोमीटरपर्यंत असू शकतो. वादळाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. तर, शनिवारी सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. शिवाय मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देत समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर आता चक्रीवादळात झाले आहे. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारी भागात ‘फेंगल’ चक्रीवादळ धडकणार असून यामुळे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. माहितीनुसार, नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर शुक्रवारी चक्रीवादळात रूपांतर झाले. हे चक्रीवादळ उत्तर तामिळनाडू-पुद्दुचेरी किनारपट्टीवरील कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान शनिवारी दुपारपर्यंत ताशी ९० किमी वेगाने धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे शुक्रवारी चेन्नईला येणारी आणि जाणारी १३ उड्डाणे रद्द करण्यात आली होती. तर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा तिरुवरूर केंद्रीय विद्यापीठाचा दौराही रद्द करण्यात आला आहे.
चेन्नई हवामान केंद्राचे संचालक डॉ. एस. बालचंद्रन यांनी उत्तर तामिळनाडू आणि किनारी जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे, इंडिगो एअरलाइन्सने प्रवाशांना कळवले होते की चेन्नई, तुतीकोरीन, मदुराई, तिरुचिरापल्ली आणि सालेम येथे जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या विमान सेवा प्रभावित होतील.
हे हि वाचा:
चॅम्पियन्स ट्रॉफीवर तोडगा काढण्यासाठी आयसीसीची बैठक आज!
काँग्रेसमध्ये संघाचे स्वयंसेवक किती?
वक्फ बोर्डाला १० कोटी रुपये देण्याबद्दल प्रशासनाने काढलेला जीआर रद्द!
डॉ. हेडगेवारांच्या ‘स्वातंत्र्य’ दैनिकाची शतकपूर्ती!
चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. तामिळनाडू आपत्ती व्यवस्थापन विभागाने २,२२९ मदत केंद्रे स्थापन केली आहेत. तिरुवरूर आणि नागपट्टिनम जिल्ह्यात १६४ कुटुंबांतील ४७१ लोकांना मदत छावण्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.