खोक्यात खेकडे असल्याचा बनाव; प्रत्यक्षात निघाली कासवे

खोक्यात खेकडे असल्याचा बनाव; प्रत्यक्षात निघाली कासवे

चेन्नई मधून मलेशियाला तस्करी करण्यात येत असलेले एक हजारहून अधिक जिवंत स्टार कासव अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. देशात किंवा देशाच्या बाहेर स्टार प्रजातीच्या कासवांच्या आयात आणि निर्यातीवर कठोर कायदे आहेत.

चेन्नई एअर कार्गो कस्टम अधिकार्‍यांनी मीनमबक्कम येथे असलेल्या एअर कार्गो एक्सपोर्ट शेडमध्ये वन्यजीव प्रजातींचा संशय असलेल्या मलेशियाला जाणारा माल रोखला. शिपिंग बिलनुसार हा माल २३० किलो जिवंत खेकडे असल्याचे घोषित करण्यात आला होता. मात्र अधिकार्‍यांना याचा संशय आला. आणि जेव्हा अधिकाऱ्यांनी अधिक तपास केला तेव्हा आढळले की, १३ पैकी ७ पॅकेजेसमध्ये एकूण एक हजार ३६४ जिवंत भारतीय स्टार कासव होते.

शिपमेंटच्या तपासणीनंतर, जिवंत स्टार कासवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पुनर्वसनासाठी तामिळनाडू वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले.

पारंपारिक औषधांमध्ये वापरल्या जाणार्‍या काही कामोत्तेजक गुणधर्मांमुळे या कासवांच्या शरीराच्या अवयवांना लक्षणीय मागणी आहे. त्यांची अंडी काळ्या बाजारात विकली जातात आणि सामान्यतः स्टार कासवांची तस्करी ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांमध्ये केली जाते. आणि वाइल्ड ट्रस्ट ऑफ इंडियाच्या मते, प्रति कासव किमान दहा हजार रु. किमतीला विकले जाते.

Exit mobile version