दिवाळी आठवड्यावर येऊन ठेपल्यामुळे बाजार फुलून गेले आहेत. आकाश कंदील, दिव्याच्या माळांची रोषणाई ग्राहकांना खुणावत आहे. अनेक कंपन्यांनी खरेदीवर भरघोस सवलतींची आतषबाजी सुरु केली आहे. दिवाळी पूर्व खरेदीसाठी शनिवार आणि रविवार सुट्टीचे दिवस असल्याने या दोन दिवशी मोठया प्रमाणावर खरेदी होणार आहे. नवरात्रीनंतरचा हा सर्वात मोठा सण असल्याने मोठ्या प्रमाणावर खरेदी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचे निर्बंध उठल्यामुळे बाजारात मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. ‘कॅट’ या देशातील सर्वात मोठ्या व्यापारी संघटनेने दिवाळीत अडीच लाख कोटी रुपयांची उलाढाल दिवाळीत होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
‘केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झालेली चार टक्के वाढ, रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या वेतनाइतका मिळालेला बोनस यामुळे दिवाळी खरेदीचा उत्साह वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शनिवार , रविवारी ग्राहकांची उसळणारी गर्दी लक्षात घेऊन त्यांच्या स्वागतासाठी व्यापारीही सज्ज झाल्याचे बघायला मिळत आहे. टीआरए रिसर्च कंपनीने केलेल्या पाहणीमध्ये ग्राहकांनी यावर्षीच्या दिवाळीत मोबाइल फोन, इमलकट्रोनिक वस्तू व दुचाकी, होम फर्निचर, ज्वेलरी व टीव्ही यांच्या खरेदीला प्राधान्य दिले आहे.
कोविड-१९ संपल्यानंतरच्या कालावधीमध्ये ऑनलाइन खरेदीला मोठी चालना मिळणार आहे. तसेच, किराणा दुकाने किंवा लहान दुकाने, आजूबाजूची दुकाने, स्थानिक किराणा दुकाने यांना खरेदीसाठी प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. सुपरमार्केट्स, हायपरमार्केट्स, ब्रँडेड आउटलेट अशा बिग फॉरमॅट स्टोअर्समध्ये खूप गर्दी होईल, असे वाटत नाही. कोविडचे नियम शिथिल केलेले असले व उत्तम सुरक्षेचे आश्वासन देण्यात आलेले असले तरी मॉलमध्ये जाण्याबद्दल फारसा उत्साह दिसत नाही. ग्राहक ब्रॅण्डशी निगडित खरेदी करतील असे या अहवालात म्हटले आहे.
हे ही वाचा:
शिंदे फडणवीस सरकारने दिली शेतकऱ्यांना दिवाळी भेट
कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात २२ जणांचा मृत्यू
INS अरिहंतवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
धक्कादायक!! पाकिस्तानमध्ये रुग्णालयात आढळले ५०० मृतदेह
दिवाळीच्या दरम्यान ग्राहक खर्च करण्याचे प्रमाण वाढते आणि निरनिराळे ब्रँड त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात, अर्थव्यवस्था मंदावली असल्याने कोविडपूर्वी ग्राहकांचे खर्च करण्याचे प्रमाण कमी झाले होते. २०१९ व २०२० या दिवाळीदरम्यान झालेल्या खर्चाची तुलना करता अगोदरच्या वर्षापेक्षा ५. १% कमी खर्च होईल, अशी शक्यता आहे टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रमौली यांनी व्यक्त केली.