साऱ्या देशाला हादरवणारा बाराबंकी अपघात झाला तरी कसा?

साऱ्या देशाला हादरवणारा बाराबंकी अपघात झाला तरी कसा?

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे झालेल्या एका भीषण अपघाताने सारा देश हादरून गेला आहे. मंगळवार, २७ जुलै रोजी रात्री उशिरा झालेल्या या अपघातात आत्तापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, तर १९ जण जखमी झाले आहेत.

लखनऊ-आयोध्या राष्ट्रीय महामार्गावर हा दुर्दैवी अपघात झाला. हरियाणाकडून बिहार येथे जात असलेल्या एका डबल डेकर बसवर ट्रक धडकून हा अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांवर सध्या लखनऊ ट्रॉमा सेंटर येथे उपचार सुरू आहेत. पण हा भीषण अपघात नेमका झालाच कसा? हा प्रश्न सध्या साऱ्यांना पडलेला दिसतो.

कसा झाला अपघात?
हरियाणा कडून बिहार कडे जात असलेली ही डबल डेकर बस अयोध्या सीमेवरील बाराबंकी येथे बंद पडली. कल्याणी नदीच्या पुलावर रात्री एक वाजताच्या सुमारास ही बस खराब झाली. वरून कोसळणारा धुवाधार पाऊस आणि बाजूने वाहणारी कल्याणी नदी अशा परिस्थितीत बस चालक आणि कंडक्टर हे दोघे बस दुरुस्त करण्यासाठी खटपट करत होते.

अशातच एक ट्रक भरधाव वेगाने लखनऊच्या दिशेने जात होता. पण अतिवेगाने जाणाऱ्या चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि हा ट्रक येऊन डबल डेकरवर धडकला. ही धडक एवढी जोरदार होती की बहुतांश लोकांचा तात्काळ मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि इतर प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्याला तात्काळ सुरुवात झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून या संपूर्ण घटनेविषयी शोक व्यक्त केला असून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर त्यासोबतच त्यांनी या घटनेत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Exit mobile version