देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवार, १७ एप्रिल रोजी मध्य प्रदेशातील नीमच येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ८६ व्या स्थापना दिनानिमित्त उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी देशातील नक्षलवाद संपवण्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या योगदानाचे कौतुक केले. तसेच मार्च २०२६ पर्यंत देशातून पूर्णपणे नक्षलवाद नष्ट होईल असा पुनरुच्चार त्यांनी केला.
अमित शाह म्हणाले की, “देशाच्या कोणत्याही भागात अशांतता निर्माण होते तेव्हा गृहमंत्री म्हणून जेव्हा कळते की, सीआरपीएफचे जवान तिथे आहेत तेव्हा मला दिलासा मिळतो. जर सीआरपीएफ तिथे असेल तर यश निश्चित आहे यावर पूर्ण विश्वास आहे. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांशी लढणे असो किंवा ईशान्येकडील भागात शांतता राखणे असो किंवा नक्षलवाद्यांना फक्त चार जिल्ह्यांपर्यंत मर्यादित ठेवणे असो या सर्व गोष्टींमध्ये सीआरपीएफ जवानांचे नेहमीच मोठे योगदान राहिले आहे,” असे अमित शाह म्हणाले.
“स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांच्या इतिहासात असे अनेक प्रसंग आहेत जेव्हा सीआरपीएफने देशाच्या सन्मानाचे आणि अभिमानाचे रक्षण केले आहे. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाखमध्ये, काही निवडक सैनिकांनी चिनी सैन्याशी लढा दिला आणि ते सर्व शहीद झाले. म्हणूनच, देशातील सर्व पोलिस दल दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलिस स्मृती दिवस म्हणून साजरा करतात,” असे अमित शाह म्हणाले.
पुढे अमित शाह यांनी सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनचे अभिनंदन केले. “३१ मार्च २०२६ पर्यंत देश डाव्या विचारसरणीच्या अतिरेकीपणापासून मुक्त होईल. देशाने ही प्रतिज्ञा घेतली आहे आणि त्यामागे आपल्या सीआरपीएफचे शूर सैनिक आहेत,” असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. सीआरपीएफचे सर्वात मोठे यश, जे देशात येणाऱ्या अनेक वर्षांत लक्षात ठेवले जाईल, ते म्हणजे सीआरपीएफने देशाला नक्षलवादापासून मुक्त करण्यात मोठे योगदान दिले. जेव्हा उर्वरित नक्षलवाद्यांना कळते की सीआरपीएफचे कोब्रा जवान त्यांच्याकडे येत आहेत, तेव्हा त्यांचा आत्मा थरथर कापतो,” असे अमित शाह म्हणाले.
हेही वाचा..
रॉबर्ट वाड्रा म्हणाले, कितीही वेळा बोलावले तरी जाऊ
नॅशनल हेराल्ड प्रकरण : गुजरातमध्ये भाजपचा ‘हल्ला बोल’
दिल्लीत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ‘आयुष्मान कार्ड’
ट्रम्प प्रशासनावर खटला दाखल करणारा भारतीय विद्यार्थी चिन्मय देवरे आहे कोण?
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ८६ व्या केंद्रीय राखीव पोलिस दल दिन सोहळ्यात परेड पाहिली. परेड दरम्यान CRPF K9 पथकाने त्यांचे कौशल्य दाखवले. नीमच येथील शहीद स्थळ, ग्रुप सेंटर येथे पुष्पहार अर्पण करून त्यांनी राष्ट्रासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली वाहिली.