हुतात्मा सहकाऱ्याच्या बहिणीला जवानांनी दिला आशीर्वाद

हुतात्मा सहकाऱ्याच्या बहिणीला जवानांनी दिला आशीर्वाद

भारतीय जवानांनी एक अनोखा आदर्श जगासमोर उभा केला आहे. सीआरपीएफचे जवान थेट उत्तर प्रदेशमधील एका लग्नात पोहचले. सीआरपीएफचे जवान शैलेंद्र प्रताप सिंह यांना गेल्या वर्षी वीरमरण आले होते. त्यांच्या बहिणीचा विवाह सोहळा उत्तर प्रदेशमधील रायबरेलीत पार पडत असताना सीआरपीएफ जवानांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. या जवानांनी लग्नाला केवळ उपस्थित न राहता सिंह यांच्या बहिणीसाठी (वधू) भावाची कर्तव्ये देखील पार पाडली.

गेल्या वर्षी शैलेंद्र प्रताप सिंह यांना वीरमरण आले होते. त्यांच्या बहिणीचा विवाह असल्याचे समजताच सिंह यांचे साथीदार युनिफॉर्ममध्येच विवाहस्थळी दाखल झाले. नवरी फेर्‍याला जात असताना या जवानांनी मंडपाची चुनरी पकडली. हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे भरून आले. त्यांनी भावाची सर्व जबाबदारी पार पडत सिंह यांच्या बहिणीला निरोप दिला. यातून या जवानांनी समाजासमोर एक नवा आदर्शच घालून दिला.

हे ही वाचा:

पुण्यात मनसेला धक्का! रुपाली पाटील यांचा राजीनामा

आजपासून मुंबईतील शाळा गजबजल्या

लग्नाचा अनोखा स्टंट पडला महागात!

यूके-भारत नैसर्गिक भागीदार

जम्मू- काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शैलेंद्र प्रताप सिंह हुतात्मा झाले होते. २००८ मध्ये सिंह यांनी सीआरपीएफमध्ये सेवेला सुरुवात केली होती. शैलेंद्र प्रताप सिंह हे दलाच्या ११०व्या बटालियनमध्ये तैनात होते. त्यांची कंपनी सोपोरमध्ये होती. दहशतवाद्यांविरोधात लढताना शैलेंद्र प्रताप सिंह यांना गोळी लागली आणि त्यामध्ये त्यांना वीरमरण आले होते. शैलेंद्र प्रताप यांच्या घरी त्यांचे वडील, आई, पत्नी, दोन बहिणी आणि नऊ वर्षांचा मुलगा आहे.

Exit mobile version