पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केल्यानंतर काय परिणाम झाले याची चाड नसलेल्या मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईज्जू यांनी पुन्हा आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. पाच दिवसांच्या चीन भेटीवर गेल्यानंतर त्यांनी एका पत्रकार परिषदेत भारतावर टीका केली आहे. आम्ही लहान आहोत म्हणून आमच्यावर अत्याचार करण्याचा परवाना मिळत नाही असे ते बोलले आहेत.
चीनच्या नादाला लागून मुईज्जू यांनी भारतावर टीका करण्याची घोडचूक केली आहे. मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लक्षद्वीप भेटीवर गेले होते तेव्हा त्यांनी लोकांना इथेसुद्धा पर्यटनास येण्यास हरकत नाही अशा स्वरूपाचे आवाहन केले होते. त्यांनी मालदीवला जाऊ नये असे सांगितले नव्हते. मात्र त्यांचा लक्षद्वीप दौरा मालदीवच्या तिघा अतिशहाण्या मंत्र्यांना झोंबला आणि त्यांनी समाज माध्यमावर पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात आला होता. या एका प्रकारानंतर मालदिवच्या पर्यटन व्यवसायावर कसा परिणाम झाला हे सुद्धा जगाने पहिले आहे. मात्र मालदीवचे अध्यक्ष चीनला काय गेले कि त्यांनी लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा टीका केली आहे.
हेही वाचा..
प. बंगालमध्ये साधूंना मारहाण करणाऱ्या १२ जणांना अटक
‘आरआरआर’ फेम अभिनेता रामचरण राम मंदिरासाठी सपत्निक आमंत्रित
इंडी आघाडीच्या संयोजकपदासाठी खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव
प. बंगालच्या पुरुलियामधील साधूंवरील हल्ला पालघरच्या हत्याकांडासारखा
चीनने मालदीवचे राष्ट्रीय सार्वभौमत्व, स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय प्रतिष्ठा राखण्यासाठी खंबीरपणे समर्थन करत असल्याचे सांगितले आहे, त्यामुळे मालदीवचे अध्यक्ष अशा पद्धतीची विधाने करू लागले आहेत. चीनने मालदीवला आपण पर्यटनासाठी चीनी जनतेला मालदीवला पाठवू असे सांगितले असले तरी चीनची खोड काय आहे, हे अजून मालदीवच्या अध्यक्षांना समजलेले नाही. भारत आणि मालदीव या दोन देशांचे संबंध कधीच वाईट नव्हते. किंबहुना मालदीवला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये भारतीय नागरिकांचीच संख्या जास्त होती. ज्या देशाची अर्थव्यवस्था केवळ पर्यटनावर अवलंबून आहे त्यांनी अशी विधाने करणे हे मुळात अपेक्षित नाही. मात्र चीनशी दोस्ताना केल्यामुळे मालदीवचे अध्यक्षांनी आशी वक्तव्ये केली आहेत. आणि पुन्हा एकदा आपल्या पायावर दगड मारून घेतला आहे.