सन २०२८मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेटचा समावेश होणार आहे. राष्ट्रकुल आणि आता आशियाई गेम्समध्ये क्रिकेटचा समावेश झाल्यामुळे जागतिक स्तरावर पोहोचलेले क्रिकेट आणि त्याची वाढती लोकप्रियता लक्षात घेतल्यास क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये प्रवेश होणे, हे नैसर्गिकच म्हटले जात आहे.
एका शतकापेक्षा जास्त कालावधीनंतर क्रिकेटचे या ऑलिम्पिकमध्ये आगमन झाल्यामुळे आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग बार्कले रोमांचित झाले आहेत. हा खेळाचा आणखी विकास होण्यासाठी जगातील सर्वांत मोठ्या क्रीडा मंचाचा वापर होणे आवश्यक होते, असे त्यांनी सांगितले.
बार्कले हे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १४१व्या सत्राच्या पार्श्वभूमीवर बोलत होते. पुरुष आणि महिला दोन्ही क्रिकेटमधील सहा संघ लॉस एंजेलिस येथे ट्वेंटी-२० स्पर्धेत भाग घेतील. यजमान संघाला थेट प्रवेश मिळेल तर, अन्य पाच संघांना पात्रता प्रक्रियेतून जावे लागेल, ज्याची घोषणा नंतर केली जाईल.
ऑलिम्पिकमधील क्रिकेट स्पर्धेचा कार्यक्रम आणि ऍथलीट कोटा २०२५च्या सुरुवातीला निश्चित केला जाईल, असे बार्कले यांनी सांगितले. ‘आम्ही लॉस एंजेल्सची आयोजन समिती आणि ऑलिम्पिक असोसिएशनला ऑलिम्पिकमध्ये प्रवेश देण्यासाठी राजी करण्याकरिता प्रयत्न केले. साहजिकच, त्यांनी आमचे विचार पटले, ज्यामुळे आज आम्ही येथे आहोत.
हे ही वाचा:
गाझा पट्टीतील रुग्णालयावरील हल्ला कोणी केला?
ठरले; भारत २०३५ पर्यंत अंतराळ स्थानक उभारणार, २०४० पर्यंत चंद्रावर मानव पाठवणार
श्वानांच्या मदतीने इस्रायलमधील पीडितांना देणार दिलासा
आता इस्रायलचे प्रमुख लक्ष्य हमासचा ‘क्रूरतेचा चेहरा’
ऑलिम्पिकसह कोणत्याही खेळांसाठी विचारात घेतले जाणारे असंख्य मुद्दे होते, त्यामुळे या प्रकरणात आम्ही त्या सर्व मुद्द्यांवर काम करत होतो. त्यामुळे या प्रवेशामुळे आम्ही आनंदित झालो आहोत,” असे बार्कले यांनी सांगितले.
‘आम्ही ऑलिम्पिकमध्ये प्रवेश घेण्यास पात्र असलेला खेळ आहोत, हे सिद्ध करण्यात आम्हाला यश आले आहे. आम्ही सर्वसमावेशक खेळ आहोत आणि आमची आदर्श व मूल्ये ऑलिम्पिक चळवळीशी जुळतात,’असेही त्यांनी नमूद केले.