क्रिकेटपटू शिखर धवन याला पत्नीने क्रूर वागणूक तसेच, मानसिक त्रास दिला असल्याचे नमूद करून दिल्ली येथील कौटुंबिक न्यायालयाने त्याचा घटस्फोट मंजूर केला आहे.
क्रिकेटपटू शिखर धवन याने पत्नी आयेशा मुखर्जी हिच्यापासून विभक्त होण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता. त्याने पत्नी आयेशाने क्रूर वागणूक दिली तसेच, मानसिक त्रास दिला. त्याच्या एकुलत्या एक मुलापासून त्याला वर्षानुवर्षे वेगळे राहण्यास भाग पाडून मानसिक त्रास दिला, असे आरोप शिखर धवनने पत्नीवर केले होते. घटस्फोटाच्या याचिकेत धवनने पत्नीवर केलेले हे सर्व आरोप न्या. हरीश कुमार यांनी मान्य केले. धवनच्या पत्नीने तिच्यावर केलेले आरोप खोडून काढण्यासाठी प्रयत्न केले नाहीत किंवा ती स्वतःचा बचाव करण्यात अपयशी ठरली, असे न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमूद केले आहे. पत्नीच्या मानसिक क्रौर्याचा मी बळी ठरलो, असे धवनने याचिकेत नमूद केले होते.
हे ही वाचा:
काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशला भारतापासून वेगळे दाखवण्यासाठी रेटला अजेंडा
हळद निर्यातीत १०० कोटी डॉलरचे लक्ष्य गाठण्यासाठी हळद मंडळाची स्थापना
नांदेडमधील शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
शिखर धवनने ऑक्टोबर २०१२मध्ये आयेशा मुखर्जीशी लग्न केले होते. आयेशा हिला पहिल्या लग्नापासून दोन मुली आहेत. आयेशाने २०२१मध्ये सोशल मीडियावर पोस्ट करून आपण घटस्फोटाच्या प्रक्रियेत असल्याचे जाहीर केले होते.
या वर्षाच्या सुरुवातीला शिखर धवनने घटस्फोटाबाबत प्रतिक्रिया दिली होती.
नात्यात चांगले काही निष्पन्न करण्यात अपयशी ठरल्याची कबुली त्याने दिली होती. ‘मी या नात्यात अयशस्वी ठरलो, कारण अंतिम निर्णय हा व्यक्तीचा स्वतःचा आहे. मी इतरांकडे बोट दाखवत नाही. मी अयशस्वी झालो कारण मला त्या क्षेत्राची माहिती नव्हती. मी आज क्रिकेटबद्दल ज्या गोष्टी बोलतो, त्या २० वर्षांपूर्वी मला माहीत नसत्या. हे माणूस अनुभवानेच शिकतो,’ असे धवन त्यावेळी म्हणाला होता. ‘सध्या माझे घटस्फोटाचे प्रकरण सुरू आहे. उद्या, जर मला पुन्हा लग्न करायचे असेल, तर मी त्या बाबत अधिक सजग होईन. मला कोणत्या प्रकारची मुलगी हवी आहे, जिच्यासोबत मी माझे आयुष्य घालवू शकेन, हे मला कळेल, असेही त्याने सांगितले होते.
तथापि, न्यायालयाने धवन याला मुलाचा कायमस्वरूपी ताबा मिळावा, याबाबत कोणताही आदेश देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने धवनला आपल्या मुलाची भेट घेण्याचा आणि त्याच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधण्याचा अधिकार भारतात आणि ऑस्ट्रेलियामध्ये दिला आहे. आयशा मुखर्जी सध्या ऑस्ट्रेलियातच राहते.