भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज खेळाडू अंशुमन गायकवाड यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक असलेल्या अंशुमन गायकवाड यांना कर्करोगाने ग्रासले होते. अखेर अंशुमन गायकवाड यांची कॅन्सरशी मात्र झुंज अपयशी ठरली.
अंशुमन गायकवाड यांचे रक्ताच्या कर्करोगामुळे गुरुवारी रात्री निधन झालं. अंशुमन गायकवाड यांनी ४० कसोटी आणि १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. याशिवाय अंशुमन गायकवाड यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि राष्ट्रीय निवड समिती सदस्य म्हणूनही भूमिका बजावली होती. अंशुमन गायकवाड यांच्यावर लंडनमध्ये गेल्या काही काळापासून रक्ताच्या कर्करोगासाठी उपचार चालू होते. गेल्याच महिन्यात ते भारतात परत आले होते. त्यांच्यावरील उपचारांसाठी बीसीसीआयने एक कोटी रुपयांची आर्थिक मदतही केली होती. अंशुमन गायकवाड यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.
अंशुमन गायकवाड हे त्यांच्या अभेद्य अशा बचावात्मक खेळीसाठी ओळखले जायचे. अंशुमन गायकवाड यांनी भारतासाठी ४० कसोटी आणि १५ एकदिवसीय सामने खेळले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक उत्कृष्ट खेळी खेळल्या. त्यापैकीच एक १९८३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळलेली २०१ धावांची खेळी होती. त्या कसोटीमध्ये अक्षरशः खेळपट्टीवर तंबू ठोकला होता. त्यांची ही खेळी तब्बल ६७१ मिनिटं चालली.
अंशुमन गायकवाड यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘एक्स’वर पोस्ट शेअर करून शोक व्यक्त केला आहे. “क्रिकेटसाठी त्यांनी दिलेल्या योगदानासाठी अंशुमन गायकवाड कायम स्मरणात राहतील. त्यांना क्रिकेटची दैवी देणगी होती. ते एक अतुलनीय प्रशिक्षक होते. त्यांच्या निधनामुळे दुःख झालं आहे. त्यांचे कुटुंबीय आणि आप्तस्वकीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती,” अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
हे ही वाचा:
ढगफुटीमुळे केदारनाथ यात्रा स्थगित; २०० यात्रेकरू अडकले
हिमाचलमध्ये ढगफुटी; पुराच्या पाण्यात ३६ जण गेले वाहून
वायनाड भूस्खलनात २५६ जणांचा मृत्यू; १९० नागरिक अद्यापही बेपत्ता
‘वहाबी अतिरेकी दहशतवादी संघटनां’वर राष्ट्रहितासाठी बंदी घाला
दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही एक्सवर शोक व्यक्त केला आहे. “अंशुमन गायकवाड यांचे कुटुंबीय व मित्र परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. संपूर्ण क्रिकेटविश्वालाच हे प्रचंड वेदनादायी आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो”, अशी पोस्ट जय शाह यांनी केली आहे.