आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने महत्त्वाचा निर्णय घेत क्रिकेट या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश केला आहे. मुंबईत सोमवार, १६ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची म्हणजेच आयओसीची १४१ वी सत्र बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयओसीने क्रिकेटच्या ऑलिम्पिकमधील समावेशाची घोषणा केली आहे. त्यामुळे २०२८ मध्ये लॉस एंजलिसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे टी- २० सामने खेळवले जाणार आहेत.
ऑलिम्पिक समितीने सांगितलं की क्रिकेट, सॉफ्टबॉल, स्क्वॉश, लॅक्रॉस आणि फ्लॅग फुटबॉल या पाच खेळांचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे. बेसबॉल या स्थानिक खेळाचा ऑलिम्पिकच्या माध्यमातून प्रसार व्हावा, अशी अमेरिकेची विनंती ऑलिम्पिक समितीने मान्य केली आहे.
स्क्वॉश हा जागतिक खेळ असून त्याच्या समावेशाविषयी अनेक वर्षे हालचाली सुरू होत्या. तसेच क्रिकेटचाही समावेश करण्यात आला आहे. आयसीसीसह क्रिकेट खेळणाऱ्या अनेक देशांच्या प्रयत्नांनंतर आता ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला आहे. आयओसीच्या या निर्णयामुळे तब्बल १२८ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे.
आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाख हे गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आहेत. गेल्या आठवड्यात बाख यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली होती. तेव्हा ते म्हणाले होते, “लवकरच ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट आणि इतर चार खेळांचा समावेश केला जाईल. आम्ही क्रिकेटची जगभरात वाढलेली लोकप्रियता पाहत आहोत. प्रामुख्याने क्रिकेटच्या टी-२० प्रकाराचे जगभरात चाहते आहेत.”
यापूर्वी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने क्रिकेटचा २०२८ च्या लॉस एंजलेस ऑलिम्पिक गेम्समध्ये समावेश करण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला होता. आयओसी सदस्य देशांनी मतदान करणे बाकी होते. मात्र, आता या पाच खेळांचा समावेश ऑलिम्पिकमध्ये होणार आहे.
हे ही वाचा:
बेपत्ता इस्रायलींच्या नातेवाईकांनी नेतान्याहूंना सांगितले हृदयद्रावक प्रसंग
सचिन तेंडुलकरने सांगितले इंग्लंडच्या पराभवाचे कारण
उद्धव ठाकरे आता समाजवाद्यांच्या पंगतीत
क्रिकेट सामन्यातील विजयानंतर इस्रायलच्या राजदूतांकडून भारताचे अभिनंदन, पाकवर टीका
क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशाचा मुद्दा हा वाडा (WADA) आणि बीसीसीआय यांच्यातील वादामुळे रखडला होता. अखेर बीसीसीआय आणि आयसीसीने २०१६ मध्ये अँटी डोपिंगची जागतिक संघटना वाडाच्या धोरणांचा स्विकार केला. आता महिला क्रिकेट देखील प्रसिद्ध होऊ लागलं आहे. त्यामुळे क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशाचा मार्ग मोकळा झाला. गेली राष्ट्रकुल स्पर्धा आणि नुकतीच झालेल्या एशियन गेम्समध्ये क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत फक्त महिला क्रिकेटचा समावेश होता. तर एशियन गेम्समध्ये पुरूष क्रिकेट आणि महिला क्रिकेट दोन्हीचा समावेश होता.