क्लिन अप प्रीमियर लीग अर्थात CPL आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे उदघाटन नुकतेच मिरा भाईंदर येथील उत्तन समुद्रकिनारी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले, मिरा भाईंदर आमदार श्रीमती गीता जैन आणि मिरा भाईंदर महानगरपालिका उपआयुक्त रवी पवार यांच्या उपस्थित झाले. या मोहिमेला आता जबरदस्त प्रतिसाद मिळत असून ही CPL आता रंगू लागली आहे.
पहिल्या स्वच्छता मोहिमेत अभिनव कॉलेज, पाटकर वर्दे कॉलेज, रॉयल कॉलेज, सायली ज्युनियर कॉलेज मधील ३५० हून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. यावेळी १० टनांहून अधिक प्लास्टिक व इतर कचरा काढण्यात आला. समुद्रकिनाऱ्यावरून काढण्यात आलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करून फक्त उरलेला प्लास्टिक हे पुन्हा उपयोगात आणण्यासाठी पुनर्वापर करणाऱ्या कारखान्यात पाठविण्यात येत आहे. प्लास्टिकचे पुनर्वापर करून वेगवेळ्या वस्तूंचे निर्माण करून आदिवासी शाळेत वाटप करण्यात येत आहे.
यावेळी ‘फ़ॉर फ़्यूचर इंडिया’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच मिरा भाईंदर शहराचे पर्यावरण दूत हर्षद ढगे, संस्थचे ध्रुव कडारा, कुंदन सोलंकी, अब्राहम, विशाल पांडे, अमीन शेख, ललित सुथार, हर्षद मुळे, तोसिम तांबोळी तसेच मिरा भाईंदर महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक उदावंत, स्वच्छता अधिकारी अक्षय धबाले, अश्विन गोहोत्रे, रोहित कांबळे व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.
पर्यावरण दूत हर्षद ढगे यांच्या संकल्पनेतुन फॉर फ्युचर इंडिया संस्था व मिरा भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तर स्वच्छ सर्वेक्षण २०२२३, नारी सशक्तीकरण, करुळकर प्रतिष्ठान व बिमा मंडी यांच्या सहकार्याने CPL आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १९ नोंव्हेबर २०२२ ते १२ मार्च २०२३ या ४ महिन्याच्या कालावधीत राबवली जाणार आहे. या स्पर्धेत प्रत्येक कॉलेजला प्रत्येक महिन्याला एक समुद्र किनारा व एक कांदळवन भाग स्वच्छ करण्याचे नियोजन केले आहे.
यामध्ये एकूण ३२ स्वच्छता मोहीम राबविल्या जातील ज्यामध्ये संघाने १ समुद्रकिनारा व १ कांदळवन स्वच्छता मोहिमेत सहभाग घेणे अनिवार्य आहे. समुद्र किनारा स्वच्छता अभियान १. उत्तन, भाईंदर २. वेलंकनी, भाईंदर ३. गोराई, बोरिवली ४. मनोरी, मालाड या ठिकाणी राबविण्यात येईल तर कांदळवन स्वच्छता अभियान हे १. भाईंदर पूर्व खाडी २. भाईंदर पश्चिम खाडी ३. बोरिवली पश्चिम येथील गोराई खाडी ४. मालाड, मनोरी येथे समुद्रकिनारी भागात राबविण्यात येत आहे. “या स्पर्धेद्वारे प्लास्टिकच्या वापराने आपल्या सागरी जीवांची हानी कशी घडते याबाबत मोठ्या प्रमाणावर जन-जागृती घडून येईल आणि मोठ्या प्रमाणावर वर्तनबदल होईल असा हर्षद ढगे यांचा विश्वास आहे.”
हे ही वाचा:
महाराष्ट्रात लवकरच ‘ई-ऑफिस’ प्रणाली
ब्रेन डेड तरुणाच्या अवयवांचे दान
राष्ट्रवादी काँग्रेसने जातीचे विष महाराष्ट्राच्या राजकारणात कालवले
गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान सुरु
या स्पर्धेत मुंबई, वसई-विरार व मिरा भाईंदर शहरातील शैलेंद्र कॉलेज, शंकर नारायण कॉलेज, लाडीदेवी रामधर कॉलेज, अभिनव कॉलेज, पाटकर वर्दे कॉलेज, अथर्व कॉलेज, भवनस कॉलेज, ठाकूर कॉलेज, D.T.S.S. कॉलेज, सह्याद्री कॉलेज, रॉयल कॉलेज, St. रॉक्स डिग्री कॉलेज, नालंदा कॉलेज, सायली ज्युनियर कॉलेज, गोखले कॉलेज, के.ई.एस. श्रॉफ कॉलेज सहभागी होत २ हजार हुन अधिक विध्यार्थ्या स्पर्धेसोबत जोडले गेले आहे. स्पर्धेत एकूण स्वच्छता मोहिमेत संघातील स्वयंसेवकांच्या उपस्थितीचा आकडा हा स्पर्धेतील ( प्रथम, द्वितीय, तृतीय ) विजयी संघ ठरेल. या संघाना विजेते पारितोषिक प्रथम रोखरक्कम २०,०००रु., द्वितीय रोखरक्कम १५,०००रु., तृतीय रोखरक्कम १०,०००रु., तसेच सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. सहभागी स्वयंसेवकांना मेडल व प्रमाणपत्र देण्याचे ठरले आहे. तसेच सहभागी संघाना सहभागी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.