झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याबाबतची घोषणा केली. राधाकृष्णन हे रमेश बैस यांची जागा घेतील. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नेमणूक झाली होती. यानंतर आता सीपी राधाकृष्णन यांची या पदावर नेमणूक करण्यात आली आहे. यासह महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली आहे.
दरम्यान, झारखंडमध्ये सीपी राधाकृष्णन यांच्या जागी भाजपचे ज्येष्ठ नेते संतोष कुमार गंगवार यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाने शनिवारी रात्री अनेक राज्यांच्या राज्यपालांच्या नियुक्त्यांची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्णन हे अनेक वर्षांपासून भाजपाचे सक्रीय सदस्य आहेत. तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. तसेच त्यांनी तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.
हे ही वाचा..
शिळफाटा अत्याचार, हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा !
विधानपरिषदेतील नवनिर्वाचित ११ उमेदवारांनी घेतली शपथ !
बांगलादेशी युट्युबर शिकवतोय, पासपोर्ट- व्हिसाशिवाय भारतात कसे घुसायचे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत १ कोटीहून अधिक भगिनींचा सहभाग
राधाकृष्णन यांनी १९९८ आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुका जिंकल्या होत्या. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीतही भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती, तरीही त्यांचा पराभव झाला होता. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रपतींनी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनियुक्त राज्यपालांची यादी
महाराष्ट्र – सी पी राधाकृष्णन
राजस्थान – हरिभाऊ बागडे
मेघालय – सी एच विजय शंकर
झारखंड – संतोषकुमार गंगवार
छत्तीसगड – रमण डेका
तेलंगणा – जीशु देव वर्मा
सिक्कीम – ओम प्रकाश माथुर
पंजाब – गुलाबचंद कटारिया
चंदीगड प्रशासक – गुलाबचंद कटारिया
पद्दुचेरी नायब राज्यपाल – के कैलासनाथन