संपूर्ण देश कोविडचा सामना करत आहे. त्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम देखील राबवली जात आहे. त्यासाठी वापरले जाणारे कोविन (CoWIN) हे संकेतस्थळ पुढील आठवड्यापासून १४ प्रांतिक भाषांमध्ये देखील उपलब्ध करून दिले जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज उच्च स्तरिय मंत्र्यांची २६ वी बैठक पार पडली. यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ही माहिती दिली. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, नागरी विमानन मंत्री हरदीप एस. पुरी इत्यादी अनेक ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
हे ही वाचा:
चक्रीवादळामुळे किनारपट्टीनजिकची कुटुंबे हलविली सुरक्षित स्थळी
रेमडेसिवीरचे देशातील उत्पादन १ कोटी १९ लाख मात्रा प्रतिमहिना
व्हेंटिलेटर्सवरून राजकारण कशाला करता; फडणवीसांचा सवाल
तौक्ते चक्रीवादळ: गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार
यावेळी डीआरडीओने विकसित केलेल्या औषधाबद्दल देखील माहिती देण्यात आली. त्यासोबतच या औषधाच्या निर्मितीत सहभाग घेणाऱ्या शास्त्रज्ञांचे कौतुक देखील करण्यात आले. आजच या औषधाचे लोकार्पण करण्यात आले होते.
कोविडच्या विषाणुचे जनुकिय संशोधन करण्यासाठी १७ नव्या प्रयोगशाळांची उभारणी करण्यात येणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले. त्यासोबत कोविडच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी नवी फिरती चाचणी केंद्रे देखील तैनात केली जाणार आहेत. त्यामुळे चाचणी करण्याची क्षमता देखील वाढणार आहे.
रेमडेसिवीरचे उत्पादन देखील वाढवण्यात आले असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली. आता देशात प्रतिमहिना १ कोटी १९ लाख मात्रांचे उत्पादन केले जात आहे.