गाय हे आपल्या भारतीय संस्कृतीचे एक अविभाज्य अंग आहे आणि गायीला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित केले जावे असे मत उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. न्यायालयातील एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान हे मत मांडण्यात आले. अलाहाबाद उच्च न्यायालयात गो हत्या प्रकरणातील एका आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू होती. न्यायमूर्ती शेखर कुमार यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. यावेळी निकाल देताना न्यायमूर्ती यादव असे म्हणाले की, ‘गो हत्या करणे हा तर गुन्हा आहेच, पण गायीला इजा पोहोचवण्याचा विचार करणाऱ्याला देखील शिक्षा व्हायला हवी.’
पुढे जाऊन न्यायालयाने ‘गायीचा कोणत्याही विशिष्ट धर्माशी संबंध नसून गाय ही संपूर्ण भारत वर्षाच्या संस्कृतीचे प्रतिक आहे’ असे स्पष्ट केले. गायीला दुखावणारा, इजा करणारा प्रत्येक जण संपूर्ण देशाच्या भावनांशी खेळतो असे मत न्यायालयाने मांडले आहे. तर देशातील गायींचे संरक्षण करणे, पालन पोषण करणे ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी असल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे.
हे ही वाचा:
‘दीन’ शिक्षकांचा शिक्षकदिनी आंदोलनाचा इशारा
आता देवालाच मैदानात उतरावे लागेल!
… मग बाकीचे मुंबईकर काय सवतीचे आहेत का?
गायीकडे केवळ एक पशू म्हणून न बघता ती देशाची संस्कृती आहे म्हणून बघितले पाहिजे. त्यासाठी गायीच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक नागरिकांनी उचलली पाहिजे. गायींचे कल्याण हेच देशाचे कल्याण आहे हे प्रत्येकाने समजून घ्यावे असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. त्याच वेळी गायींच्या संरक्षणासाठी कठोर कायदा आवश्यक असल्याचे मतही न्यायालयाने नोंदवले आहे. केंद्र सरकारने या संबंधात कठोर कायदा करावा आणि त्या कायद्याचे पालन होणे गरजेचे आहे असे मत न्यायालयाने नोंदवले आहे.