कोविडची होणार हार, लसीकरण ५० कोटी पार

कोविडची होणार हार, लसीकरण ५० कोटी पार

कोविड १९ या महामारीच्या विरोधात साऱ्या जगाचे युद्ध सुरू आहे. या युद्धात भारत देश एक महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. कोरोना महामारी विरोधातले एकमेव प्रभावी अस्त्र म्हणजेच कोविड प्रतिबंधक लस.

कोविड लसीकरणाची जगातील सर्वात मोठी मोहीम ही भारतात सुरू आहे आणि सुरुवातीपासूनच भारत या मोहिमेत अनेक महत्त्वाचे टप्पे पार करताना दिसत आहे. लसीकरण मोहिमेत अशीच एक ऐतिहासिक कामगिरी भारताने केली आहे. लसीकरणाच्या बाबतीत भारताने ५० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. म्हणजेच भारतात आजवर एकूण ५० कोटी लसींचे डोस दिले गेले आहेत.

शुक्रवार ६ ऑगस्ट रोजी देशभरात ४३ लाख २९ हजारपेक्षा अधिक लसींचे डोस दिले गेले आणि त्याचबरोबर भारताने हा पन्नास कोटींचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला.

भारतातील लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यापासून भारताने आपल्या लसीकरणाचा वेग वाढवत नेला आहे. १० करोड लसींचा टप्पा ओलांडायला भारताला ८५ दिवसांचा अवधी लागला होता. तर पुढील ४६ दिवसातच भारताने २० करोडचा टप्पा पूर्ण केला. त्यानंतर ३० करोडचा टप्पा पार करायला भारताला आणखीन २९ दिवस लागले. तर ४० करोडचा टप्पा पार करायला अवघे २४ दिवस पुरे पडले आणि आता त्यानंतर फक्त २० दिवसांच्या अवधीमध्ये भारताने ५० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. म्हणजेच अवघ्या २० दिवसात १० कोटी लसी भारतीयांना देण्यात आल्या आहेत. त्याची सरासरी जर काढली तर दिवसाला ५० लाख लोकांना लस देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

…म्हणून मिराबाईने केला १५० ट्रक चालकांचा सत्कार

आदर पुनावाला म्हणून भेटले आरोग्यमंत्र्यांना…

आपात्कालिन वापरासाठी जॉन्सन अँड जॉन्सनकडून देखील अर्ज

या राज्यालाही द्या, भारतीय हॉकीच्या यशाचे श्रेय!

भारताच्या या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी ट्विट करत या लढाईला आज मोठे बळ मिळाल्याचे म्हटले आहे. लसीकरणाच्या आकडेवारीने ५० कोटींचा टप्पा पार केला आणि आता याच भक्कम पायावर आपण लसीकरणाची संख्या अधिकाधिक वाढवत नेऊ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. ‘सर्वांना लस, मोफत लस’ या मोहिमेच्या अंतर्गत देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version