देशभरातील पालकांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी असून आता १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होणार आहे. लहान मुलांचे लसीकरण पुढच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या कोविड- १९ कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी दिली आहे.
आतापर्यंत, मुलांसाठी सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत, १५ ते १७ वर्षे वयोगटातील एकूण ३.३१ कोटी मुलांना त्यांचा पहिला डोस मिळाला आहे. डॉ. अरोरा यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितले की, आम्ही १५ ते १७ या वयोगटातील सर्व ७.४ कोटी मुलांना जानेवारीच्या अखेरीस पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जेणेकरून फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून त्यांना दुसरा डोस देता येईल. तसेच फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या सुरुवातीपासून १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम गाझी याचा कराचीत मृत्यू
एसटीच्या “लेखा” विभागाने निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन गिळून टाकली..!
मुंबईकरांना दिलासा; कोरोना रुग्णांची संख्या घटतेय
१२ ते १७ वयोगटातील मुले ही प्रौढांसारखीच असतात म्हणून, प्रामुख्याने १५ ते १७ या वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाचा निर्णय घेण्यात आल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सीन ही लस या वयोगटाला दिली जाऊ शकते असे वृत्त देण्यात आले आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांचे लसीकरण सुरू होणार असल्याची घोषणा केली होती.