देशामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे तांडव चालू होते. मात्र त्यापाठोपाठ आता काळ्या बुरशीची काळी सावली देखील देशावर गडद होत जात आहे. देशात या आजाराचे एकूण ८८४८ रुग्ण आढळून आले आहेत. या एकूण रुग्णांपैकी २०० रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
‘म्युकरमायकोसिस’ या आजाराचा समावेश साथरोग कायद्यात केला गेला आहे. त्याबरोबरच आता देशभरात ‘काळी बुरशी’वर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या बुरशी विरुद्धचे औषध ‘एम्फोटेरिसिन-बी’ची मागणी वाढल्याचंही दिसून आले आहे. याच दरम्यान शनिवारी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना ‘एम्फोटेरिसिन-बी’चे एकूण २३ हजार ६८० अतिरिक्त वायलचे वाटप करण्यात आले आहेत. केंद्रीय रसायन व खत मंत्री डीव्ही सदानंद गौडा यांनी ही माहिती दिली.
सदानंद गौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘म्युकरमायकोसिस’चे सर्वाधिक २२८१ रुग्ण गुजरातमध्ये आढळले आहेत. राज्याला ५,८०० इंजेक्शनचे डोस पुरवण्यात येणार आहेत.
हे ही वाचा:
अजित दादा, उद्धव ठाकरेंना सल्ला द्या
कोरोना आणि ५जी चा काहीही संबंध नाही
पूर्व किनाऱ्यावर ‘यास’ वादळाची पूर्वतयारी
चक्रीवादळापेक्षा जास्त वेगाने मुख्यमंत्र्यांचा दौरा
त्यानंतर महाराष्ट्रात २००० रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्राला या इंजेक्शनचे ५०९० डोस पुरवण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात एकाच दिवशी या आजाराने १२ जणांचा मृत्यु झाला होता.
औषधांची देशातील मागणी वाढत आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय स्तरावर औषधांच्या खरेदी करण्याचा सल्ला, याआधी दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला गुरूवारी दिला होता.
याबरोबरच देशातील इतर अनेक राज्यांत देखील या आजाराचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे कोविड पाठोपाठच या आजाराची चिंता देखील आता वाढू लागली आहे.