देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत चाचण्यांचे प्रमाण वाढत आहे, तरीही रुग्णसंख्येत मात्र घट होताना दिसत आहे. कोवीड संदर्भातील भारत सरकारच्या उच्चस्तरीय बैथाकीत ही माहिती समोर आली. मार्च महिन्याच्या सुरूवातीला देशात दर आठवड्याला सुमारे 50 लाख चाचण्या केल्या जात होत्या. पण आता हे प्रमाण आठवड्याला १.३ कोटी चाचण्या इतके झाले आहे. तसेच मधल्या काही काळात दररोज चार लाखांच्या संख्येने नवे रुग्ण आढळत होते, मात्र आरोग्यसेवा कर्मचारी, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे यातही आता घट झाली आहे.
देशातील कोविड आणि लसीकरण संबंधित परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी शनिवार, १५ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत देशातील कोविडशी संबंधित सद्यस्थितीबाबत अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. कोविडची राज्य व जिल्हा स्तरीय स्थिती, चाचणी, ऑक्सिजन उपलब्धता, आरोग्य सेवा संबंधी पायाभूत सुविधा, लसीकरण आराखडा या सर्वांविषयी अधिकाऱ्यांनी सविस्तर सादरीकरण केले.
या बैठकीत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, ज्या राज्यातील जिल्ह्यांमध्ये चाचणी सकारात्मकता दर (टीपीआर) जास्त आहे अशा राज्यांसाठी स्थानिक प्रतिबंधाचे धोरण ही काळाची गरज आहे. विशेषतः ज्या भागात उच्च चाचणी सकारात्मकता दर आहे तेथे आरटीपीसीआर आणि रॅपिड टेस्ट या दोन्हींचा वापर करून चाचण्या आणखी वाढवणे आवश्यक आहे. उच्च संख्येचा दबाव न घेता पारदर्शकपणे रुग्णांची संख्या नोंदविण्यासाठी राज्यांना प्रोत्साहित केले पाहिजे असे मत पंतप्रधान मोदींनी मांडले. ग्रामीण भागात रोग्यसेवा संसाधने वाढवून घरोघरी जाऊन चाचणी व देखरेखीवर लक्ष केंद्रित करावे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. तर आशा आणि अंगणवाडी सेविकांना सर्व आवश्यक साधनांसह सक्षम बनवण्याची सूचना पंतप्रधानांनी केली. ग्रामीण भागामध्ये गृह विलगीकरण आणि उपचारांबाबत सुलभ भाषेत उदाहरणांसह मार्गदर्शक सूचना उपलब्ध केल्या जाव्यात असे पंतप्रधान म्हणाले.
हे ही वाचा:
वर्ध्यात तयार होणार म्युकरमायकोसिसवरील औषध
रवी पुजारीच्या अटकेनंतर सुरेश पुजारीच्या कारवाया सुरू?
पब्लिक सब जानती है…देवेंद्र फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र
कोवॅक्सिनचे उत्पादन १० कोटी डोस प्रतिमहिना पर्यंत वाढवणार
तर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सच्या आवश्यक तरतुदींसह ग्रामीण भागात ऑक्सिजन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचा वितरण आराखडा तयार करावा, असे निर्देश पंतप्रधानांनी बैठकी दरम्यान दिले. अशा प्रकारची उपकरणे हाताळण्यासाठीचे आवश्यक ते सर्व प्रशिक्षण आरोग्य कर्मचार्यांना दिले पाहिजे आणि अशा वैद्यकीय उपकरणांच्या सुलभ उपयोगासाठी आवश्यक तो वीजपुरवठाही सुनिश्चित केला जावा, असेही पंतप्रधानानी नमूद केले.
या बैठकी दरम्यान पंतप्रधानांनी व्हेंटिलेटर्सच्या मुद्द्यावरही भाष्य केले. काही राज्यांमध्ये व्हेंटिलेटर्स विनावापर पडून असल्याची वृत्ते प्रसार माध्यमांमध्ये आली होती. या वृत्तांची गंभीर दखल पंतप्रधानांनी घेतली आहे. केंद्र सरकारतर्फे पुरवण्यात आलेल्या व्हेंटिलेटरच्या इन्स्टॉलेशन आणि ऑपरेशनचे त्वरित ऑडिट करण्याचे निर्देश यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. आवश्यकतेनुसार आरोग्य सेवा कामगारांना व्हेंटिलेटर योग्य रीतीने वापरण्यासाठी नव्याने प्रशिक्षण दिले जावे, असेही पंतप्रधान म्हणाले.
या बैठकीत देशाच्या लसीकरण मोहिमेबद्दलही चर्चा करण्यात आली. अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना लसीकरण प्रक्रिया आणि राज्यनिहाय लसीकरणाची माहिती देण्यात आली. तसेच आगामी काळातील लस उपलब्धतेच्या योजनेबाबतही चर्चा झाली. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी राज्यांच्या सहकार्याने काम करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
यावेळी पंतप्रधानांनी शास्त्रज्ञ आणि विषय तज्ञ यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. सुरुवातीपासूनच भारताच्या विरुद्धच्या लढ्याला शास्त्रज्ञ आणि विषय तज्ञांनी मार्गदर्शन केले आहे आणि त्यांचे हे मार्गदर्शन यापुढेही आपल्याला मिळत राहील असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी ट्विटरच्या माध्यमातून या बैठकीविषयी माहिती दिली आहे.
Discussed a number of issues during today’s review meeting on COVID-19, including scaling up testing in areas with high TPR, preparing localised containment strategies, augmenting health capacities in rural areas and ramping up the speed of vaccination. https://t.co/ysQmtDiZAQ
— Narendra Modi (@narendramodi) May 15, 2021