भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)च्या आदित्य एल-१ सूर्यमोहिमेने पृथ्वीच्या कक्षेबाहेर प्रयाण करून सूर्याच्या दिशेने झेप घेतली आहे. हे सूर्ययान पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर दूर अंतरावरील एल-१ पॉइंटवरून सूर्याचा अभ्यास करेल. मात्र एवढ्या तप्त वातावरणात हे काम करणे सोपे खचितच नाही. म्हणूनच या तप्त वातावरणातही काम करू शकेल, अशाच प्रकारे आदित्य सूर्ययान साकारण्यात आले आहे. सूर्याच्या बाह्य वातावरणाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. फोटोस्फीयर, क्रोमोस्फीयर आणि करोना. करोना हा सर्वांत वरचा स्तर आहे, जो एका रहस्यापेक्षा कमी नाही.
आदित्य एल-१ चार महिन्यांनंतर एल-१ पॉइंटवर पोहोचणार असून तेव्हाच तो आपले काम सुरू करेल. या मोहिमेद्वारे मिळणाऱ्या माहितीसाठी केवळ भारतच नव्हे तर जगभरातील देश उत्सुक आहेत. करोना हा सूर्याच्या बाह्य वातावरणाचा सर्वांत वरचा स्तर आहे. मात्र करोनाचे तापमान उर्वरित दोन स्तरांपेक्षा ५०० ते दोन हजार पट अधिक आहे. त्याची रुंदी सुमारे १० हजार किमी सांगितली जात आहे. वैज्ञानिकांच्या मते, या स्तराचे तापमान १० ते २० लाख डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे. ग्रहणादरम्यान या स्तराला पाहता येऊ शकते.
वरून दुसरा स्तर म्हणजेच करोनाच्या खालील स्तर क्रोमोस्फीयर म्हणून ओळखला जातो. त्याची रुंदी तीन हजार किमी आहे. या स्तराचा रंग लाल आहे. यातून सौर तरंग उमटतात, जी करोनापर्यंत पोहोचतात. या स्तरावरचे तापमान सात हजार ते १४ हजार डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे.
हे ही वाचा:
पवईत एअर होस्टेसची हत्या, फ्लॅटमध्ये मिळाला मृतदेह
तब्बल ६१ हजारवेळा विजा कडाडल्या; ओदिशात १२ मृ्त्युमुखी
ज्येष्ठ साहित्यिक, प्राध्यापक श्रावण गिरी यांचे अपघाती निधन
‘वंदे भारत’ चीन सीमेपर्यंत धावणार
क्रोमोस्फीयरच्या खालील स्तर फोटोस्फीयर म्हणून ओळखला जातो. यातूनच निघालेला प्रकाश पृथ्वीवर पोहोचून सर्वांना ऊर्जा देतो. यातून युवी रे, चुंबकीय विकिरण आणि रेडियो तरंगही उमटतात. या स्तराचे तापमान चार हजार ते सहा हजार डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे. त्यामुळेच सूर्याच्या सर्वांत वरच्या स्तराचे तापमान हे खालच्या स्तराच्या तापमानापेक्षा जास्त का आहे, याबाबत उत्सुकता आहे. वैज्ञानिकांच्या मते, सूर्यावर येणाऱ्या वादळांमुळे वरच्या स्तराचे तापमान उच्च असावे. त्यामुळेच आदित्य एल १ मिशन हे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करेल.