पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी रात्री उशिरा संयुक्त राज्य अमिरातची राजधानी दुबईत पोहोचले. येथील भारतीय समाजाने त्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. पंतप्रधान दुबईत आल्याच्या आनंदात लोकांनी वंदे मातरम् आणि भारतमाता की जयच्या घोषणा दिल्या. पंतप्रधान शुक्रवारी कॉप-२८च्या जागतिक हवामान बदल शिखर परिषदेत सहभागी होत आहेत.
बोहरा समुदायाकडून आनंद व्यक्त
येथील बोहरा समाजाकडूनही मोदींच्या दौऱ्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला. ‘पंतप्रधान मोदी आम्हाला एका कुटुंबासारखे मानतात. भारताचा संपूर्ण जगात गौरव वाढत आहे. भारताची लोकप्रियता वाढत आहे,’ असे दाऊदी बोहरा समाजाचे सदस्य डॉ. मुस्तफा ताहीर यांनी सांगितले.
हे ही वाचा:
९७ तेजस विमाने, १५० हुन अधिक लढाऊ हेलिकॉप्टर खरेदीस सरकारने दिली मंजुरी!
दत्ता दळवी यांचे पाप प्रकाश आंबेडकरांपेक्षा मोठे आहे का?
योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग
समूह विद्यापीठात सहभागी होताना महाविद्यालयाचे अनुदान कमी होणार नाही
अरिंदम बागची यांनी केले ट्वीट
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनीही मोदी यांच्या दुबई दौऱ्याबाबत माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी कॉप-२८ जागतिक हवामान कृती परिषदेसाठी दुबईत पोहोचले. विमानतळावर उपपंतप्रधान आणि गृहमंत्री शेख सैफ बिन जायद अन नाहयान यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान जागतिक नेत्यांसह बैठक घेतील आणि हवामान बदलासंदर्भातील मोहिमा सुरू ठेवण्यासाठीच्या विविध कार्यक्रमांत सहभागी होतील, असे त्यांनी ट्वीट करून सांगितले.
आता परिषदेची प्रतीक्षा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबाबत ट्वीट करून माहिती दिली. ‘शिखर परिषदेचा उद्देश पृथ्वीला चांगला ग्रह करण्याचा आहे. भारताने नेहमीच सामाजिक, आर्थिक विकासासह हवामान बदलाबाबतही गंभीरपणे विचार केला आहे. आमच्या अध्यक्षतेखालील जी-२० परिषदेत हवामान बदलाच्या समस्यांना आम्ही नेहमीच प्राधान्य दिले आहे. दिल्ली घोषणापत्रातही हवामान बदलासंदर्भातील कारवाई आणि सातत्यपूर्ण विकासावर ठोस कारवायांचा समावेश आहे,’ असे ते म्हणाले.