फ्रान्सिस झेवियर हा १५४२ मध्ये गोव्यात आलेला जेसुइट मिशनरी. तो जेसुइट पंथाच्या संस्थापकांपैकी एक होता. त्याने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर, विशेषतः गोव्यात पोर्तुगीज वसाहतीत ख्रिश्चन धर्माचा पुष्कळ प्रसार केला. मात्र हा प्रसार वादविवाद, चर्चा, त्यांतून पुढे मतपरिवर्तन, व मग ख्रिश्चन धर्माचा स्वेच्छेने स्वीकार, अशा तऱ्हेने मुळीच झालेला नाही. तो निरनिराळी प्रलोभने, आमिषे, सोयीसवलती आणि / किंवा सक्ती, शिक्षा, बळजबरी, कत्तली, अशा बऱ्याच गैर मार्गांनी केला गेला आहे. यामध्ये एक मोठा भाग “इन्क्विझिशन” या भयानक संस्थेचा / यंत्रणेचा आहे.
“इन्क्विझिशन” : म्हणजे थोडक्यात ख्रिश्चनांची धार्मिक न्यायव्यवस्था (?) असे म्हणता येईल. ख्रिश्चन धर्माच्या, चर्चच्या, बायबलच्या आदेशाविरुद्ध वागणाऱ्याना वाटेल तशा भयानक शिक्षा, नुसता मृत्युदंड नव्हे, तर भयानक रित्या छळ करून नंतर मृत्यू, अशा शिक्षा दिल्या जात. गोव्यात इन्क्विझिशनची यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी अगदी पहिली सूचना फ्रान्सिस झेवियर यानेच केली होती. दि. १६ मे १५४५ रोजी पोर्तुगालचा राजा डी. जोआओ तृतीय याला लिहिलेल्या पत्रात त्याने
ही सूचना केली होती. मात्र ती प्रत्यक्ष अमलात यायला काही वर्षे जावी लागली. इ.स. १५६० पासून गोव्यात सुरु झालेली
इन्क्विझिशन यंत्रणा १८१२ पर्यंत अस्तित्वात होती. हा काळ ख्रिश्चन धर्मप्रसारकांच्या दृष्टीने सुवर्णकाळ होता.
इन्क्विझिशन चा वापर : हिंदू व बौद्ध धर्माचा पद्धतशीरपणे संपूर्ण नाश करण्यासाठी केला गेला. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी / पोर्तुगीज सरकारने हिंदू मंदिरे नेमकी किती पाडली ती आकडेवारी उपलब्ध नसली, तरी १५६६ पर्यंत सुमारे १६० मंदिरे गोव्यात पाडली गेली, असा अंदाज आहे. त्याखेरीज १५६६ ते १५६७ मध्ये फ्रान्सिस्कन मिशनऱ्यांनी आणखी ३०० मंदिरे उत्तर गोव्यातील बार्डेज भागात, तर आणखी ३०० मंदिरे दक्षिण गोव्यातील साल्सेट भागात पाडली. असोनिया आणि कुंकोलीम सारख्या इतर ठिकाणी पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी आणखीही मंदिरे पाडली. पोर्तुगीज पुरातत्व खात्याकडे उपलब्ध असलेल्या १५६९ सालच्या एका पत्रात असा स्पष्ट उल्लेख आहे, की त्यांच्या भारतीय वसाहतीतील सर्वच्या सर्व हिंदू मंदिरे जाळून, पाडून नष्ट करण्यात आली आहेत.
१५६६ ते १५७६ मध्ये लागू करण्यात आलेल्या नवीन इन्क्विझिशन कायद्यानुसार जुनी हिंदू मंदिरे दुरुस्त करणे, किंवा नवी बांधणे यावर बंदी घातली गेली. उघड / जाहीर पद्धतीने हिंदू विवाह विधी कायद्याने प्रतिबंधित होते. कोणाही व्यक्तीपाशी हिंदू देवदेवतेची मूर्ती आढळली, तर त्याला गुन्हेगार ठरवले जाई. गोव्यातील अहिंदू लोकांना अशा मूर्ती बाळगणाऱ्या हिंदूंची
तक्रार / चहाडी इन्क्विझिशन अधिकाऱ्यांकडे करण्यासाठी उद्युक्त केले जाई. आरोपीची झडती घेतली जाई, आणि जर तसे काही आढळले, तर अशा मूर्ती बाळगणाऱ्या हिंदूला अटक होऊन, त्याची मालमत्ता जप्त केली जाई. जप्त मालमत्तेतील अर्धा हिस्सा तक्रार करणाऱ्याला आणि उरलेला अर्धा हिस्सा चर्चकडे जात असे ! हिंदू धर्मग्रंथाचे वाचन, पारायण यांवर कडक बंदी होती, व तसे करणाऱ्यास कठोर शिक्षा दिल्या जात. १६२० मध्ये एका आदेशानुसार हिंदू पद्धतीने विवाहविधी करण्यावरच बंदी घाली गेली. १६८४ च्या एका आदेशाने कोकणी भाषेची मुस्कटदाबी करून, पोर्तुगीज भाषा बोलणे सक्तीचे करण्यात आले. ह्या आदेशानुसार स्थानिक भाषा बोलताना कोणी आढळल्यास त्याला कडक शिक्षा करण्याची तरतूद असे. ह्याच आदेशानुसार स्थानिक भाषांतून लिहिलेले सर्व बिगर ख्रिश्चन धर्मग्रंथ, किंवा इतर सांस्कृतिक साहित्य नष्ट करणे सक्तीचे होते. एक फ्रेंच डॉक्टर, चार्ल डेल्लोन ह्याने इन्क्विझिशन मधील क्रौर्य, आणि छळणूक यांचा स्वतः अनुभव घेतला. त्याने तुरुंगात कैदेत असताना हिंदू आरोपींचा होणार छळ, त्यांची उपासमार स्वतः प्रत्यक्ष पाहिली. अखेरीस फ्रेंच सरकारच्या दबावाने कशीबशी सुटका झाल्यावर, फ्रांसमध्ये परत गेल्यावर १६८७ मध्ये त्याने “The Inquisition of Goa” नावाच्या पुस्तकांत ह्या अनुभवांचे वर्णन करून ठेवले आहे.
मूर्तिभंजक फ्रान्सिस झेवियर : झेवियरने केरळच्या पश्चिमेस कोल्लम किनाऱ्यावरील भागाच्या पोर्तुगीज गवर्नर च्या मदतीने “मुक्कुवा” नामक कोळी जमातीच्या असंख्य लोकांना ख्रिश्चन केले. झेवियर ह्याला केवळ हिंदूंना बाटवून ख्रिश्चन करण्यातच रस होता, असे नसून त्याला ते पूर्वी ज्या मूर्तींची पूजा करीत, त्या मूर्ती फोडल्या गेलेल्या बघणेही त्याला आवडे. मलबार किनाऱ्यावरील हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण केल्यावर त्यांने “सोसायटी ऑफ जीझस” ला लिहिलेल्या एका पत्रात, त्याला हिंदूंच्या मूर्ती फोडल्या जाताना बघण्यात किती अपरिमित आनंद होत असे, त्याचे वर्णन केले आहे. झेवियर लिहितो, “बाप्तिस्मा झाल्यानंतर ते नव्याने ख्रिश्चन झालेले लोक त्यांच्या घरी परत जात, आणि त्यांच्या बायकामुलांना, कुटुंबियांना घेऊन, (त्यानाही बाप्तिस्मा देण्यासाठी) पुन्हा परत येत. अशा तऱ्हेने सर्वांचा बाप्तिस्मा झाल्यावर, मी आज्ञा देई, की आता त्या भागात सर्वत्र जी मंदिरे असतील, ती पाडून टाकून त्यातील मूर्ती फोडल्या जाव्यात. जे लोक एकेकाळी स्वतःच ज्या मूर्ती पूजित असत, त्यांच्याच हातून त्या मूर्ती फोडल्या जाताना बघून मला होणारा अपरिमित आनंद व्यक्त करायला माझ्यापाशी शब्द नाहीत !” (पत्र दि. ८ फेब्रुवारी १५४५. – एच. जे. कोलरीज लिखित – Life and Letters of Francis Xavier, London, 1861, Vol. I, p. 10) आणि ह्यात विशेष म्हणजे, कोल्लमच्या हिंदू राजाकडून चर्चेस बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला गेल्यानंतर लगेचच झेवियर कडून ही कृत्ये केली गेली. केव्हढी ही कृतघ्नता !
ऐतिहासिक वस्तुस्थिती : हीच आहे, की पोर्तुगीज , हे एका हातात ‘क्रूस’ आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊनच भारतात आले. इ स १५५७ ते १५७८ या काळात गादीवर असलेल्या पोर्तुगालचा राजा जोआओ तृतीय हा ख्रिश्चन धर्मप्रसाराच्या बाबतीत अतिशय कट्टर होता. भारतातील पोर्तुगीज व्हाईसरॉय ला त्याने लिहिलेल्या पत्रात, मूर्तींच्या विध्वंसाच्या किती तपशीलवार सूचना दिल्या आहेत ते के. एम. पणिक्कर या प्रसिद्ध इतिहासकारांच्या Malabar and the Portuguese, Voice of India, New Delhi, 1977, या पुस्तकात पाहायला मिळते. राजा लिहितो, “पोर्तुगीजांनी आपले सगळे सामर्थ्य, सगळी ताकद ह्या बाबतीत पणाला लावली पाहिजे. भारतातील आपल्या अधिपत्याखाली असलेल्या इतर भागांतच नव्हे, तर खुद्द गोव्यातही, मूर्तीपूजा अजूनही सुरु आहे, हे पाहून मी किती अस्वस्थ आहे, ते तुम्हाला सांगू इच्छितो. किती मुक्तपणे आणि स्वातंत्र्याने ते (मूर्तिपूजक) त्यांचे सणवार, उत्सव साजरे करतात, त्याची मला पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच मी तुम्हाला आदेश देतो, की हुशार आणि कार्यक्षम अधिकारी नेमून तमाम मूर्ती शोधून, हुडकून काढा, आणि जिथे सापडतील, तिथे त्यांचे तुकडेतुकडे करा. जे कोणी मूर्ती / शिल्पकृती बनवतील, त्यावर कलाकुसर करतील, त्यांना रंगवतील, तसेच जे कोणी पितळ, अन्य धातू, लाकूड, प्लास्टर, यांपासून मूर्ती बनवतील, किंवा अन्य ठिकाणाहून मूर्ती आणतील, अशांना भयंकर कडक शिक्षा द्या. ख्रिश्चन धर्माचे पक्के शत्रू असलेल्या ब्राह्मणांना आश्रय देणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या. जराही दयामाया न दाखवता अशा लोकांना तुम्ही शिक्षा केल्याने आम्हाला आनंद होईल.“
यावरून हे स्पष्ट होते, की फ्रान्सिस झेवियर आणि पोर्तुगीज राजसत्ता ही मूर्तीपूजा, आणि हिंदुधर्माचा नाश करण्यासाठी काहीही करण्यास सज्ज होते. ख्रिश्चन मिशनरी भारतात येऊन पोचल्यावर थोड्याच कालावधीत, १५४१ पासून सर्व हिंदू मंदिरे बंद करून टाकली गेली. १५५९ पर्यंत अंदाजे ३५० हून अधिक मंदिरे नष्ट केली गेली, इतकेच नव्हे तर खाजगीरित्या केली जाणारी मूर्तीपूजा सुद्धा बंद करण्यात आली.
इन्क्विझिशन ची भयानकता : इ.स. १५६० पासून सुरु होऊन इ.स. १८१२ पर्यंत अमलात राहिलेले ‘इन्क्विझिशन’ हे भयानक छळ आणि क्रौर्य यासाठी कुप्रसिद्ध होते. हा पोर्तुगीज मिशनऱ्यांच्या दृष्टीने सुवर्णकाळ असून, त्यांत सामान्य माणसांचे जगणे, मरणे ख्रिश्चन धर्मगुरूंच्या हातात होते. रिचर्ड झिमलर याच्या “गार्डियन ऑफ डॉन” (Guardian of Dawn) नावाच्या अत्यंत लोकप्रिय पुस्तकात गोव्यातील इन्क्विझिशन संबंधी समग्र माहिती ग्रथित करण्यात आली आहे, ज्यामध्ये त्याने इन्क्विझिशन ला “मृत्यूची यंत्रणा” (‘Machinery of death’) म्हटले आहे. धर्मांतरास नकार देणाऱ्यांचा भयंकर छळ होई, इतकेच नव्हे, तर काहींना जिवंत जाळण्याची शिक्षा सुद्धा दिली जाई. धर्मांतरास तयार न होणाऱ्या पालकांच्या बाबतीत, त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या लहान मुलांचे हातपाय तोडले जाणे, ते दृश्य त्यांनी सक्तीने पहावे, यासाठी त्यांचे डोळे, – ते धर्मांतरास तयार होईपर्यंत – जबरीने, टेप वगैरे लावून, उघडे ठेवणे, – ही एक अत्यंत ‘परिणामकारक’ (?) शिक्षा होती.
या २५२ वर्षांच्या इन्क्विझिशन च्या काळात बिगर ख्रिश्चन मुर्तीपुजकांचे अतोनात हाल झाले. एखादी लहानशी मूर्ती घरात सापडणे, किंवा एखादी गैर ख्रिश्चन प्रार्थना / स्तोत्र हळू आवाजात उच्चारणे, एव्हढ्या वरून लोकांना इंक्विझीशनच्या खास तुरुंगात डांबून त्यांचा छळ केला जाई. असा अंदाज आहे, की सतराव्या शतकाच्या अंतापर्यंत हिंदूंचा हा वंशविच्छेद (Ethnic cleansing) जवळ जवळ पूर्ण होत आला, कारण तोपर्यंत गोव्यातील त्यावेळच्या एकूण लोकसंख्येपैकी – अडीच लाखांपैकी जेमतेम २०००० बिगर ख्रिश्चन उरले होते !
जेसुइट इतिहासकार फादर फ्रान्सिस्को डी सूझा म्हणतो, की भारतातील इन्क्विझिशन चा उद्देश हिंदुधर्म, आणि भारतात हिंदूंसह सुखाने राहणारे ज्यू यांचा संपूर्ण नाश करणे हाच होता. अलान मचाडो –प्रभू नावाच्या इतिहासकाराने पोर्तुगीजांनी गोवा कसे जिंकले, आणि त्यावर दहशतीच्या जोरावर कसे राज्य केले, त्याविषयी लिहून ठेवलेय : “सुमारे अडीचशे वर्षांच्या त्यांच्या गोव्यातील वास्तव्यात इन्क्विझिशन नामक भयंकर यंत्रणेने किमान ५७ जणांना जिवंत जाळले. वेगवेगळ्या क्रूर शिक्षा देण्यात आलेल्यांची संख्या ४०४६ इतकी आहे. जे लोक धर्मांतर होऊनही गुप्तपणे, छुप्या रीतीने हिंदू प्रथा / विधी पाळीत, त्यांना अधिकच कठोर शिक्षा दिली जाई. चर्चने या काळात स्वतःची संपत्ती ज्या रीतीने वाढवली, ते भ्रष्टाचाराचे ढळढळीत उदाहरण म्हणावे लागेल. एखाद्याकडे मूर्ती आढळल्यास त्याची अर्धी संपत्ती चर्चकडे जाई ! अशा रीतीने शहरी व ग्रामीण भागात चर्चने प्रचंड मालमत्ता मिळवली. यामध्ये फ्रान्सिस झेवियर हा सगळ्यात मोठा गुन्हेगार होता, ज्याला पुढे “संतत्व” बहाल केले गेले.”
विख्यात फ्रेंच विचारवंत, लेखक वोल्तेअर याने त्याच्या सुप्रसिद्ध शैलीत हे थोडक्यात शब्दबद्ध केले आहे : “गोवा हा त्याच्या ‘इन्क्विझिशन’ मुळे दुर्दैवाने कुप्रसिद्ध आहे, जे मानवतेला कलंक आहे. पोर्तुगीज धर्मगुरूंनी आम्हाला असे खोटेच भासवले, की भारतातील लोक सैतानाचे पूजक आहेत; मात्र वस्तुस्थिती अशी होती, की तेच (पोर्तुगीज) सैतानाची सेवा करत होते.”
सध्याची स्थिती : फ्रान्सिस झेवियर याचा मृत्यू चीनच्या वाटेवर असताना (प्रवेशाची अनुमती मिळवण्याच्या प्रतीक्षेत असताना) ३ डिसेंबर १५५२ रोजी शांगचुआन नावाच्या चीनी बेटावर झाला. इ.स. १५५३ मध्ये त्याचे मृत शरीर गोव्यात आणून ठेवले गेले. तेथील बॉम जीझस बासिलिका नावाच्या चर्चमध्ये एका चांदीच्या पेटीत हे अवशेष सुरक्षित जागी ठेवलेले असून दर दहा वर्षांनी ते भाविकांच्या दर्शनासाठी उपलब्ध केले जातात. अशा तऱ्हेने त्यांचे शेवटचे दर्शन २२ नोव्हेंबर २०१४ ते ४ जानेवारी २०१५ या काळात झाले. त्यापूर्वी असे दर्शन २१ नोव्हेंबर २००४ ते २ जानेवारी २००५ या काळात केले
गेले. विशेष म्हणजे, त्याच्या मृत शरीराचा उजवा हात, इ.स. १६१४ मध्ये रोमन कॅथलिक चर्चच्या आदेशानुसार अलग करून, रोम मधील जेसुइट पंथाच्या मुख्य चर्चमध्ये असाच चांदीच्या पेटीत जतन करून ठेवण्यात आला आहे. फ्रान्सिस झेवियर सारख्या धर्मवेड्या अत्याचारी, जुलमी व्यक्तीच्या मृत शरीराचे अवशेष आज इतकी वर्षे गोव्यात सुरक्षित जतन केले जाणे, हे हिंदूंच्या कमालीच्या सहिष्णुतेचे मूर्तिमंत प्रतीक आहे.
-श्रीकांत पटवर्धन