वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरला अटकेपासून दिलासा

दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरला अटकेपासून दिलासा

केंद्रीय लोकसेवा आयोगाने म्हणजेच यूपीएससीने उमेदवारी रद्द केलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. यूपीएससीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकर यांना अटक केली जाणार होती. या अटकेला पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर न्यायमूर्ती सुब्रमोनियम प्रसाद यांच्यासमोर सुनावणी झाली असता त्यांनी पूजा खेडकर यांना २१ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा देत म्हटले आहे की, त्यांना तात्काळ अटक करण्याची गरज नाही. पूजा खेडकर यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी केलेला अर्ज पटियाला हाऊस न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर पूजा खेडकरनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सोमवारी सुनावणी पार पडली.

पूजा खेडकर यांच्या विरोधात नागरी सेवा परीक्षेत परवानगीपेक्षा जास्त संधी मिळविण्यासाठी स्वतःची बनवत बनावट ओळख करून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. युपीएससीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी पूजा खेडकर यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे पोलिसांकडून त्यांना अटक होण्याची शक्यता होती. यानंतर पूजा खेडकर यांनी दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. खेडकर यांच्या अर्जावर सुनावणी होईपर्यंत अटक करू नये, असे आदेश दिले आहेत.

हे ही वाचा :

रामलला झाले अब्जाधीश, भाविकांनी अर्पण केले ५५ अब्ज रुपये !

हिंडेनबर्गच्या आरोपांनंतर अदानी समूहाचे शेअर्स सात टक्क्यांनी कोसळले

फारुख अब्दुल्ला बरळले, म्हणे सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये संगनमत

स्पर्धेदरम्यान वजन नियंत्रित करणे ही खेळाडूची आणि प्रशिक्षकाची जबाबदारी

नेमकं प्रकरण काय आहे?

पूजा खेडकर हिचे प्रशिक्षण ३ जून २०२४ पासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झाले होते. पूजा खेडकर यांनी त्यांच्या खासगी गाडीवर अंबर दिवा लावत महाराष्ट्र शासन असे लिहिले होते. याबाबत वाद झाल्याने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांची तत्काळ वाशीम येथे बदली झाली होती. वाशीममध्ये दोन वर्षांचा प्रशिक्षण कालावधी होता; मात्र आता यावर स्थगिती देण्यात आली होती. खासगी गाडीवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह धरणे यामुळे प्रशिक्षणावर असलेल्या पूजा खेडकर चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर खेडकर यांच्या शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप झाला, त्याबाबत चौकशी सुरू होती. याच मुद्द्यांवर पंतप्रधान कार्यालय आणि मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमीने पूजा खेडकर यांची चौकशी सुरू केली होती. पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याचा आरोप आहे.

Exit mobile version