मध्य रेल्वे क्षेत्रात रेल्वे रूळ ओलांडताना प्राण गमावणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. ही संख्या कमी करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून मध्य रेल्वे क्षेत्रात १६ पादचारी पूल २०२१ पर्यंत बांधण्यात येणार आहेत. हे पूल दोन रेल्वे स्थानकांच्या मध्ये बांधण्यात येणार आहे. १६ पैकी १४ पूल हे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आहेत तर दोन पूल हे हार्बर मार्गावर आहेत.
हार्बर मार्गावर बांधण्यात येणाऱ्या चार पुलांपैकी बेलापूर आणि खारघर येथील पूल बांधून झाले आहेत. वाशी आणि सीवूड जवळील पुलांचे बांधकाम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होईल. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाण्याच्या उत्तरेकडील भागात जास्त पूल बांधण्यात येत आहेत. केवळ दोन पूल हे नाहूर आणि विक्रोळी जवळ बांधण्यात येत आहेत, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे.
रेल्वे रूळ ओलांडताना २०२० मध्ये ६३५ लोकांचा मृत्यू झाला होता तर त्याच्या आधीच्या वर्षी १, १३५ लोकांचा मृत्यू झाला होता. २०२० मध्ये तुलनेने मृत्यू कमी झाले होते. सामान्य प्रवाशांना प्रवास मुभा नसल्यामुळे ही संख्या कमी असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
हे ही वाचा:
केरळमध्ये अशी झाली ‘दृश्यम’ स्टाईल हत्या
शिवसेना आमदाराच्या उपस्थितीत ‘जुलूस जबरदस्ती’
रोहितच्या ऐतिहासिक शतकामुळे भारत मजबूत स्थितीत
मृत्यू झालेल्या लोकांची संख्या जास्तच आहे. लोकही अनेकदा वेळ वाचवण्यासाठी म्हणून पूर्वेकडून पश्चिमेला जाताना किंवा पश्चिमेकडून पूर्वेला येताना पादचारी पुलांचा वापर न करता रेल्वे रूळ ओलांडण्याचा मार्ग निवडतात त्यामुळे अपघात होत असतात, असेही ते म्हणाले.
रेल्वे मार्गांवरील अपघातांमुळे रेल्वे उशिराने धावणे आणि रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी होणे अशा समस्याही निर्माण होत असतात. पश्चिम रेल्वेवर पादचारी पुलांची संख्या वाढवल्यामुळे तसेच काही संरक्षक भिंती उभारल्यामुळे अपघातांची संख्या २०१८ पासून ५० टक्क्यांनी घटली आहे.