संविधान, महाकुंभ, मलेरियाचा पराभव आणि कॅन्सरवर उपचार!

पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'मध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख

संविधान, महाकुंभ, मलेरियाचा पराभव आणि कॅन्सरवर उपचार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (२९ डिसेंबर) त्यांच्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी लोकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. याशिवाय पीएम मोदींनी संविधानावरही भाष्य केले. ‘मन की बात’ च्या ११७ व्या एपिसोडमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की २६ जानेवारी २०२५ रोजी आपली राज्यघटना लागू होऊन ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या सर्वांसाठी ही खूप अभिमानाची बाब आहे. आपल्या संविधान निर्मात्यांनी आपल्या हाती दिलेली राज्यघटना काळाच्या कसोटीवर उतरली आहे. संविधान आमच्यासाठी दिशा दाखवणारा प्रकाश आहे, आपला मार्गदर्शक आहे. भारताच्या राज्यघटनेमुळेच आज याठिकाणी असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’चा यावर्षीचा हा शेवटचा भाग होता.

देशातील नागरिकांना संविधानाच्या वारशाशी जोडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘Constitution७५.com’ या वेबसाइटला भेट देण्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, देशातील नागरिकांना संविधानाच्या वारशाशी जोडण्यासाठी http://constitution७५.com नावाची एक विशेष वेबसाइट देखील तयार करण्यात आली आहे. यामध्ये तुम्ही संविधानाची प्रस्तावना वाचून तुमचा व्हिडिओ अपलोड करू शकता. तुम्ही राज्यघटना वेगवेगळ्या भाषांमध्ये वाचू शकता आणि संविधानाबद्दल प्रश्नही विचारू शकता. मी ‘मन की बात’ च्या श्रोत्यांना, शाळेत शिकणारी मुले आणि महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणांना विनंती करतो की, या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि त्याचा एक भाग व्हा.

पंतप्रधान मोदींनी आगामी काळात होणाऱ्या महाकुंभाचा उल्लेख केला. महाकुंभाची वैशिष्ट्ये सांगताना ते म्हणाले,

महाकुंभाचे वैशिष्ट्य केवळ त्याच्या विशालतेमध्ये नाही तर कुंभचे वैशिष्ठ्य त्याच्या विविधतेमध्येही आहे. या कार्यक्रमात करोडो लोक एकत्र येतात. लाखो संत, हजारो परंपरा, शेकडो पंथ, अनेक आखाडे, प्रत्येकजण या कार्यक्रमाचा एक भाग बनतो. कुठेही भेदभाव नाही, कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. विविधतेतील एकतेचे असे दृश्य जगात कुठेही दिसणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

कुंभ कार्यक्रमात प्रथमच एआय चॅटबॉटचा वापर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याद्वारे कुंभशी संबंधित प्रत्येक प्रकारची माहिती ११ भारतीय भाषांमध्ये मिळू शकते. मजकूर टाइप करून किंवा बोलून कोणीही या चॅटबॉटवरून कोणत्याही प्रकारची मदत मागू शकतो.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, पुढील वर्षी पहिल्यांदाच जागतिक ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट म्हणजेच WAVES समिटचे आयोजन केले जाणार आहे. तुम्ही सर्वांनी दावोसबद्दल ऐकले असेल, जिथे जगातील व्यापारी नेते एकत्र येतात. त्याचप्रमाणे वेव्हस समिटमध्ये जगभरातील मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज आणि सर्जनशील जगतातील लोक भारतात येणार आहेत. भारताला जागतिक सामग्री निर्मितीचे केंद्र बनवण्याच्या दिशेने ही शिखर परिषद एक महत्त्वाचे पाऊल आहे.
हे ही वाचा : 
कुत्र्याच्या पिल्लाचा विनोदी पद्धतीने वापर
संजय राऊत बोलतात त्याच्या नेमके उलटे घडते!
दिल्लीत सापडले ८ बांगलादेशी नागरिक, बांगलादेशला रवानगी!

पंतप्रधान मोदी म्हणाले, काही आठवड्यांपूर्वी सुमारे २३ हजार इजिप्शियन विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत भाग घेतला होता. तिथे त्यांना भारताची संस्कृती आणि दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंध दाखवणारी चित्रे तयार करायची होती. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व तरुणांचे मी कौतुक करतो.

जगप्रसिद्ध वैद्यकीय जर्नल लॅन्सेटचा अभ्यास खरोखरच आशादायी आहे. त्यानुसार आता भारतात कर्करोगावरील उपचार वेळेवर सुरू होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढली आहे. वेळेवर उपचार म्हणजे कर्करोगाच्या रुग्णावर ३० दिवसांत उपचार सुरू होतात आणि यात ‘आयुष्मान भारत योजने’चा मोठा वाटा आहे.

या योजनेमुळे ९० टक्के कॅन्सर रुग्णांना वेळेवर उपचार सुरू करता आले आहेत. पूर्वी पैशांअभावी गरीब रुग्ण कॅन्सरचे निदान आणि उपचार करण्यापासून दूर जात असे. आता ‘आयुष्मान भारत योजना’ त्यांच्यासाठी मोठा आधार बनली आहे. आता तो उपचार घेण्यासाठी पुढे येत आहे.

पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मध्ये सांगितले की, मलेरिया हा रोग मानवतेसाठी चार हजार वर्षांपासून एक मोठे आव्हान आहे. स्वातंत्र्याच्या वेळीही हे आपल्या आरोग्यापुढील सर्वात मोठे आव्हान होते. आज मी समाधानाने सांगू शकतो की, देशवासीयांनी मिळून या आव्हानाचा जोरदार सामना केला आहे.

ते पुढे म्हणाले,  जगातील सर्वात जुनी भाषा तामिळ आहे आणि प्रत्येक भारतीयाला तिचा अभिमान आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. जगभरातील देशांमध्ये ते शिकणाऱ्या लोकांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस, भारत सरकारच्या सहकार्याने फिजीमध्ये तमिळ शिकवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. फिजीमध्ये तामिळचे प्रशिक्षित शिक्षक ही भाषा शिकवण्याची गेल्या ८० वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे.

Exit mobile version