बांगलादेशचे खासदार अन्वरुल अझीम अनार यांच्या हत्येतील प्रमुख सूत्रधार अख्तरझझमान हा काठमांडूहून दुबईमार्गे अमेरिकेत पळून गेला असावा, अशी शक्यता बांगलादेश गुप्तहेर विभागाचे प्रमुख हारुन-ओर-रशिद यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रमुख सूत्रधाराला अटक करण्यासाठी इंटरपोल आणि गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) यांची मदत घेतली जाईल, अशी माहिती हारून यांनी दिली.
गुन्ह्याची तीव्रता आणि त्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम यामुळे कायदेशीर कारवाईसाठी अख्तरझ्झमनला शोधण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ‘मुख्य सूत्रधार अख्तरझ्झमान काठमांडूहून दुबईमार्गे अमेरिकेत पळून गेला असावा. आम्ही इंटरपोलच्या माध्यमातून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही सीआयडी कार्यालयात जाणार आहोत. तिथे सीआयडीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहोत. अटक केलेल्या आरोपींची चौकशी करणार असून जेणेकरून आम्हाला अधिक माहिती मिळू शकेल,’ असे त्यांनी रविवारी कोलकाता विमानतळावर उतरल्यावर पत्रकारांना सांगितले.
अनार यांची हत्या कोलकात्यात करण्यात आली. तिथेच त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले आणि अनेक प्लास्टिक पिशव्यांमधून त्यांच्या अवशेषांची विल्हेवाट लावण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी बांगलादेशी गुप्तहेरांचे एक पथक भारतात रवाना करण्यात आले आहे. ‘आम्ही नुकतेच येथे आलो आहोत. तुम्हा सर्वांना माहीत आहे की आमच्या फौजदारी कायद्यात, एक्स्ट्रा टेरिटोरियल ऑफेन्स नावाचे कलम आहे, याचा अर्थ असा की जर एखाद्या व्यक्तीने बांगलादेशाबाहेर गुन्हा केला तर, आम्ही, या एक्स्ट्रा टेरिटोरियल ऑफेन्स कलमांतर्गत, त्या गुन्ह्यांचा तपास करू शकतो,’ असे हारून यांनी सांगितले.
महत्त्वपूर्ण पुरावे गोळा करण्यासाठी गुन्ह्याचे ठिकाण तपासणे आणि सीसीटीव्ही फुटेजची छाननी करणे यावरही त्यांनी भर दिला. पत्रकारांना संबोधित करताना, त्यांनी या प्रकरणातील गुंतागुंत विशद केली. ‘तुम्हा सर्वांना माहीत आहे की आमचे एक लोकप्रिय खासदार अन्वारुल अझीम अनार यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती आणि त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते. या हत्येचा मास्टरमाईंड, लाभार्थी आणि हत्येचा कट तडीस नेणारे सर्व बांगलादेशी आहेत. पश्चिम बंगाल गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अनारच्या शरीराचे अवयव जप्त करण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे.
हे ही वाचा:
फिरकीपटूंची भेदक गोलंदाजी; गंभीर- नारायणचा मास्टरस्ट्रोक
लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार
इस्रायलचा राफा शहरावरवर हवाई हल्ला; ३५ जणांचा मृत्यू
एका संशयित, मुंबईस्थित कसायाने, अख्तरझ्झमन यांच्या मार्गदर्शनाखाली खासदाराच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आपला सहभाग असल्याची कबुली दिली आहे,’ असेही हारून यांनी सांगितले.पोलिसांनी सांगितले की, ‘हल्लेखोरांनी जिहाद (उर्फ सियाम) नावाच्या एका कसायाला आणले, जो अनेक वर्षांपासून मुंबईत बेकायदा राहात होता. दोन महिन्यांपूर्वी त्याला बांगलादेश वंशाचा अमेरिकी नागरिक अख्तरझ्झमन शाहीन याने कोलकात्यात आणले होते. या नियोजित क्रूर हत्येचा शाहीन मास्टरमाइंड आहे. कथित सूत्रधार अख्तरुझमान शाहीन याने अन्य चार बांगलादेशी नागरिकांच्या मदतीने अनारच्या हत्येचा कट रचला होता. त्यानंतर त्यांनी फ्लॅटमध्ये शरीराचे तुकडे केले आणि नंतर सर्व काही पॉलिथिन पॅकमध्ये ठेवले.
तसेच, हाडांचे छोटे तुकडे केले आणि नंतर ते छोट्या छोट्या पिशव्यांमधून बाहेर काढले. वेगवेगळ्या वाहनांमधून त्या पिशव्या कोलकाता आणि आसपासच्या भागात टाकल्या, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी निवेदनाद्वारे दिल होती.
या गुन्ह्याची उकल करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमन खान यांनी अनार यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजारो देऊन हत्येशी संबंधित तीन जणांना अटक केल्याचे जाहीर केले आहे.