नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशात आल्यापासून भारतातील लोकशाहीचा अंत झाला, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी सुरू आहे, न्यायालये सरकारच्या ताब्यात आहेत असे अनेक आरोप विरोधक करू लागले. प्रत्यक्षात त्यात किती तथ्य होते हे वारंवार समोर येत राहिले. विशेष करून जेव्हा सरकारच्या विरोधात एखादा निकाल न्यायालयाने दिला तेव्हा न्यायालये ही निष्पक्ष असल्याचा शोध विरोधक लावत होते तर निकाल विरोधकांच्या अपेक्षेनुसार नसला तर मात्र हीच न्यायालये सरकारला किंवा भारतीय जनता पार्टीला दिलासा देणारी आहेत, असा आरोप केला गेला. हे सगळे आता भारतातील लोकांच्या चांगलेच अंगवळणी पडलेले आहे. तरीही रोजच्या रोज असेच आरोप केले जातात. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांत फूट पडल्यानंतर त्यासंदर्भात न्यायालयात सुनावण्या सुरू आहेत पण त्यात कोणतीही प्रगती झालेली नसल्यामुळे न्यायालयच वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप केला जातो. पण तेच न्यायालय इलेक्टोरल बॉण्डबाबत सरकारवर टीका करते तेव्हा मात्र न्यायालय निष्पक्ष निर्णय करते. हीच लोकशाहीची स्वतःला हवी तशी व्याख्या करणारे पक्ष रोज लोकशाही, संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यासाठी बेंबीच्या देठापासून ओरडत असतात. संविधानाची पुस्तके हातात नाचवतात. पण संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पालन करण्याची वेळ आली की, मात्र त्यांचे खरे रंग दिसू लागतात.
सध्या काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांच्या मुलाखती होत आहेत, भाषणे होत आहेत. डॅलस, टेक्सास येथेही त्यांचे भाषण व मुलाखती झाल्या. त्याचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या इंडिया टुडेचे पत्रकार रोहित शर्मा यांना काँग्रेसच्या या नव्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अनुभव आला.
त्यांनी आपल्या या अनुभवाची बातमी दिली आहे. ते म्हणतात की, डॅलस येथे राहुल गांधी येणार म्हटल्यावर त्याअनुषंगाने एखादी बातमी करावी म्हणून ओव्हरसीज काँग्रेसचे चेअरमन सॅम पित्रोदा यांच्याशी बोलणे झाले. त्यांची एखादी मुलाखत करावी अशी इच्छा होती. पित्रोदा यांनी तसा वेळ दिला. ओव्हरसीज काँग्रेसच्या तिथल्या पदाधिकाऱ्यांशीही भेटीगाठी झाल्या. मुलाखतीसाठी पित्रोदांकडे गेल्यावर तिथे जवळपास ३० लोक उपस्थित होते. त्यातील काही भारतातूनही आले होते. काही लोक हे ओव्हरसीज काँग्रेसचे होते. पित्रोदा यांच्याशी भेट झाली आणि मुलाखतीची तयारी झाली.
पत्रकार रोहित शर्मा यांनी म्हटले आहे की, या मुलाखतीचे मोबाईल फोनवर रेकॉर्डिंगही सुरू झाले. ३-४ प्रश्न पित्रोदा यांना विचारले तेव्हा त्यांनी त्याची उत्तरेही दिली. नंतर एक प्रश्न बांगलादेशातील हिंदूंबाबत विचारला. बांगलादेशातील हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत, तो मुद्दा राहुल गांधी आपल्या या भेटीदरम्यान इथल्या खासदारांसमोर काढणार आहेत का, असा प्रश्न रोहित शर्माने विचारला तेव्हा त्यावर पित्रोदा म्हणाले की, याबाबत आपल्याला काही माहीत नाही. ते उत्तर पूर्ण करणार तेवढ्यात उपस्थित लोकांपैकी काही लोकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्याचदरम्यान पित्रोदा हे राहुल गांधींची व्यवस्था बघण्यासाठी निघून गेले. पण पत्रकार मात्र या लोकांच्या तावडीत सापडले. बंद करा, बंद करा अशा आरोळ्या ठोकल्या जाऊ लागल्या. हा वादग्रस्त प्रश्न विचारू नका, अशी मागणी केली जाऊ लागली. मग त्यातील काही लोकांनी पत्रकाराच्या हातातील फोन खेचून त्यातील मुलाखत डीलिट केली. शिवाय, त्यात आणखी एखाद्या फोल्डरमध्ये ती सेव्ह झाली आहे का हे पाहताना त्यांच्या लक्षात आले की, फोन हा फेस आयडीवर अनलॉक होतो. त्यासाठी पत्रकाराच्या तोंडासमोर फोन धरण्यात आला आणि तो अनलॉक करण्यात आला. त्यानंतर ती मुलाखत आणखी कुठे सेव्ह झालेली असेल तिथून ती डीलिट केली गेली. तो फोन आपल्या ताब्यात चार दिवस ठेवण्याबाबतही ते लोक बोलत होते. सुदैवाने तो फोन पत्रकाराला मिळाला.
हे ही वाचा:
गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची सांगत वकिलाला लुटणारा सापडला सिंधुदुर्गात
भारताच्या परकीय चलन गंगाजळीचा नवा उच्चांक!
राजकोट पुतळा प्रकरण: जयदीप आपटेला २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
सरकारी फाईल्सवर सही करायची नाही! केजरीवालांना न्यायालयाचे आदेश
त्यानंतर मग त्याने पित्रोदा यांना मेसेज करत इथे जे घडले त्याबाबत त्यांना अवगत केले. तेव्हा त्यांनी आपण पुन्हा मुलाखत करूया असे आश्वासन दिले. अर्थात, तशी मुलाखत पुढे झालीच नाही. पण या सगळ्यातून हे लक्षात आले की, आपल्याला सोयीस्कर प्रश्न विचारले जात असतील तर तोपर्यंत अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते वेगळा प्रश्न विचारला की, ते स्वातंत्र्य नाहिसे होते.
अर्थात, राहुल गांधींनी यापूर्वीही अडचणीचे प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर तुम्ही भाजपाच्या लाईनवर बोलता आहात. त्यांचे चिन्ह असलेले टीशर्ट घालून या असेही म्हणायला कमी केलेले नाही. या संपूर्ण प्रकरणात राहुल गांधी थेट सहभागी नसले तरी काँग्रेसकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची अशी गळचेपी होणे हे स्वाभाविक म्हटले पाहिजे. मागे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनाही असाच प्रश्न एका पत्रकाराने विचारल्यावर तुम्ही तिकडून आलात का, असा खोचक प्रश्न आदित्य ठाकरेंनीच पत्रकाराला विचारला होता. यावरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी बडबड करणाऱ्यांना ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य किती कळले याची जाणीव होते.