१५ ऑगस्टनंतर मुंबईत होणारी इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (इंडिया)ची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. ही बैठक विरोधी आघाडीची भविष्यातील दिशा ठरवेल. या बैठकीत आघाडीच्या संयोजकांसह अध्यक्षपदाच्या निवडीबाबतही चर्चा होणार आहे.
मुंबईतील बैठकीत विरोधी पक्ष समन्वय समिती ‘इंडिया’तील सदस्यांची निवड, आघाडीचे संयोजक आणि किमान कार्यक्रम ठरवण्याबाबत चर्चा करेल. या आघाडीच्या अध्यक्षपदी काँग्रेसची व्यक्ती असावी, अशी मागणी पक्षातून होऊ लागल्याचे समजते. या बैठकीत काँग्रेस ‘इंडिया’च्या अध्यक्षपदावर हक्क सांगेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. आघाडीतील सर्वांत मोठा पक्ष असल्याने ‘इंडिया’चा अध्यक्ष काँग्रेसमधून झाला पाहिजे, असे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या पदासाठी काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्ष सोनिया गांधी पहिली पसंती आहेत.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान, मुख्यमंत्री, निवडणूक आयोगावर टोमणा अस्त्राचा वापर
राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राला अंतिम विजेतेपद
काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणात चार वर्षांचा तुरुंगवास
अबब!! ऍप्पलचे बूट तेही ४० लाखांचे!
बेंगळुरूत झालेल्या बैठकीत अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांना अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली होती. मात्र त्या स्वत: यासाठी तयार नाहीत. अर्थात त्या काँग्रेस संसदीय दलाची जबाबदारी सांभाळत राहतील. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. तर, संयोजकपदासाठी बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांना प्रबळ दावेदार मानले जात आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी सर्वांत प्रथम नीतीशकुमार यांनीच पुढाकार घेतला होता. त्यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनाही महत्त्वाची पदे मिळण्याची शक्यता आहे.