उत्तर प्रदेशातील सीतापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस खासदार राकेश राठोड यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राकेश राठोड यांना लोहारबाग येथील घरी पत्रकार परिषद घेत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने या प्रकरणातील अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राठोड यांना अटक करण्यात आली आहे. लग्नाच्या बहाण्याने एका महिलेचे चार वर्षे लैंगिक शोषण केल्याचा त्यांचावर आरोप आहे. राठोड यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान यांच्या एकल खंडपीठाने हा आदेश दिला.
फिर्यादीने चार वर्षांनंतर हा खटला दाखल केल्याचे याचिकाकर्त्याच्यावतीने उपस्थित असलेल्या वकिलाने न्यायालयाला सांगितले. हायकोर्टाने याचिका निकाली काढत राकेश राठोड यांना दोन आठवड्यांत सत्र न्यायालयात शरण येण्यास सांगितले होते. अखेर आज कारवाई करत त्यांना आज अटक करण्यात आली.
हे ही वाचा :
छत्तीसगडः सात महिलांसह २९ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
मनसेला लोकांनी मते दिली पण ती पोहोचलीच नाहीत
चंडीगड महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय
महाकुंभ: मिलिंद सोमणचे सपत्नीक संगमात स्नान, म्हणाला ‘धन्य’ वाटले!
दरम्यान, महिलेने तक्रार दिल्यानंतर १७ जानेवारी रोजी उत्तर प्रदेश पोलिसांनी राठोडविरोधात गुन्हा दाखल केला होता. तीन दिवसांनंतर, काँग्रेस खासदारांचे वकील अरविंद मसदलन आणि दिनेश त्रिपाठी यांनी सीतापूरमध्ये अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल केली. मात्र, सीतापूर येथील खासदार-आमदार न्यायालयाने २३ जानेवारी रोजी राठोडचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. याचिका फेटाळल्यानंतर राठोड मीडियासमोर हजर होताच पोलिसांनी त्यांना अटक केली.