काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आपल्या मुलांसाठी पदयात्रेच्या माध्यमातून लाँचिंग?

अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण, विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार, दिलीप वळसे पाटील यांची मुलगी पूर्वा वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड सहभागी

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आपल्या मुलांसाठी पदयात्रेच्या माध्यमातून लाँचिंग?

राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यापासून या यात्रेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नेते दाखल होत आहेत. मात्र ते करत असताना आता आपल्या मुलांनाही या यात्रेच्या माध्यमातून लाँच करण्याचा प्रयत्न हे नेते करत आहेत.

नांदेड येथे ही यात्रा सुरू असताना त्यात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची मुलेही राहुल गांधी यांच्यासोबत चालताना दिसली. त्याबद्दल एकीकडे कौतुक होते आहे तर आपापल्या मुलांना लाँच करण्यासाठी पदयात्रेचा उपयोग केला का, अशी टीकाही होऊ लागली आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण, विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार, दिलीप वळसे पाटील यांची मुलगी पूर्वा वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड या पदयात्रेत सहभागी झाले. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या मुलीसंदर्भात एक कविता ट्विट केले होते. त्यात अशोक चव्हाण म्हणतात की,

पिल्लांच्या पंखात जेव्हा बळ येतं

त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो

आणि आभाळात झेप घेण्यासाठी

जेव्हा ती सज्ज होऊ लागतात

तेव्हा पाखरांना होणारा आनंद

अवर्णनीय असाच राहात असणार!

हे ही वाचा:

तिकीट न मिळालेला आपचा नेता चढला ट्रान्समीटरवर

रेशनधान्य दुकानही आता हायफाय, मिळणार सर्वसामान्यांना वायफाय

न थकण्याचे रहस्य सांगताना मोदी म्हणाले, मी दोन-चार किलो शिव्या खातो!

तेलंगणात सर्वत्र कमळ फुलणार

 

श्रीजया आणि सुजया या अशोक चव्हाण यांच्या कन्या राहुल गांधीसोबत पदयात्रेत सहभागी झाल्या.  या यात्रेत सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाडही सहभागी झाले होते. सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रणिती शिंदेही पदयात्रेत दिसल्या.

पण ही यात्रा म्हणजे आपापल्या मुलांना लाँचिंग करण्याचे माध्यम असल्याची टीका भाजपाने केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ही पदयात्रा या नेत्यांनी आपल्या मुलांसाठी हायजॅक केली आहे. अशोक चव्हाण मुलीसाठी प्रयत्न करत आहेत. पण यामुळे लहान कार्यकर्त्यांना वाटते की, हा नेत्यांच्या मुलांना लाँच करण्याचा उपक्रम आहे की काय?

अशोक चव्हाण यांनी आपल्या मुली राजकारणात येऊ इच्छितात असे मागे म्हटले होते. पण तो निर्णय मात्र त्यांच्यावरच असेल असे ते म्हणाले होते.

Exit mobile version