प्रसिद्ध चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांच्या विरोधात ब्राह्मण समाजाबाबत “आपत्तिजनक आणि अपमानजनक” टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार दिल्लीच्या तिलक मार्ग पोलीस ठाण्यात उज्ज्वल गौड नावाच्या व्यक्तीने दाखल केली आहे. गौड यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले की, अनुराग कश्यप यांची टिप्पणी केवळ घृणास्पद आणि अशोभनीयच नाही, तर समाजात द्वेष पसरवणारी, सार्वजनिक शांतता भंग करणारी आणि सांप्रदायिक तणाव वाढवणारी आहे.
हा वाद बुधवारी उसळला, जेव्हा अनुराग कश्यप यांनी इंस्टाग्रामवर एका युजरला उत्तर देताना ब्राह्मणांबाबत अत्यंत लाजीरवाणी गोष्ट लिहिली. यावरून सोशल मीडियावर मोठा गहजब झाला आणि लोकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. गौड यांनी हे ब्राह्मण समाजाच्या आत्मसन्मानावर थेट आघात असल्याचे सांगून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. मात्र, वाद वाढल्यानंतर शुक्रवारी अनुराग कश्यप यांनी या टिप्पणीबाबत सार्वजनिकरित्या माफी मागितली. त्यांनी इंस्टाग्रामवर लिहिले, “ही माझी माफी आहे – माझ्या पोस्टसाठी नाही, तर त्या एका ओळीसाठी जी संदर्भाच्या बाहेर काढून मांडली गेली आणि जिच्यामुळे द्वेष पसरवला जात आहे. कोणतीही गोष्ट किंवा विधान इतकी गंभीर नसते की त्यामुळे तुमच्या कुटुंबियांना, मैत्रिणींना, मुलींना बलात्कार आणि जिवे मारण्याच्या धमक्या मिळाव्यात.
हेही वाचा..
“बांगलादेशला जाण्यापूर्वी पुनर्विचार करा!” ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन नागरिकांना का दिला इशारा?
भारतीय विद्यार्थिनीला कारने चिरडले
पश्चिम बंगालममध्ये राष्ट्रपती शासन लागू करा
प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वलसांगकर यांची आत्महत्या
कश्यप पुढे म्हणाले, “जे काही म्हटले गेले, ते मागे घेतले जाऊ शकत नाही आणि मी ते मागे घेणारही नाही. तुम्ही मला शिव्या घाला, पण माझ्या कुटुंबाने काहीही म्हटले नाही. त्यामुळे जर तुम्हाला माफी हवी असेल, तर ही माझी माफी आहे. ब्राह्मणांना फक्त एवढंच सांगतो – स्त्रियांना सोडा, इतकं तर शास्त्रांमध्येही शिकवलं आहे, केवळ मनुस्मृतीत नाही.” खरंतर, हा सगळा वाद त्या वेळी सुरू झाला, जेव्हा एका युजरने अनुराग कश्यप यांच्यावर भडकाऊ टिप्पणी केली, त्याच्या प्रत्युत्तरात कश्यप यांनी वादग्रस्त विधान केलं.
हा वाद त्यांच्या आगामी ‘फुले’ या चित्रपटाभोवतीही फिरतो आहे, जो जात आणि लिंग भेदभावावर आधारित आहे. सुरुवातीला हा चित्रपट ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, पण अखिल भारतीय ब्राह्मण समाज आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या आक्षेपांमुळे तो पुढे ढकलण्यात आला. सेन्सॉर बोर्डाने काही बदल सुचवले, जे स्वीकारण्यात आले आहेत. आता हा चित्रपट २५ एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.