लोकल सुरू नसल्यामुळे सर्वसामान्यांचे खूप हाल होताहेत. त्यामुळे आता प्रवासी संघटना ठाकरे सरकारविरोधात चांगल्याच आक्रमक झालेल्या आहेत. त्यामुळेच आता ठाकरे सरकारला प्रवासी संघटनांनी त्यांच्याच शब्दात आता इशारा द्यायला सुरुवात केलेली आहे. याच धर्तीवर सीएसएमटी व मंत्रालयाजवळ आता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
कोरोना लस घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय पर्यटनाला परवानगी आहे, मग लोकल प्रवास का नाही असा सवाल आता आंदोलनकर्ते ठाकरे सरकारला विचारत आहेत. मुंबईसाठी लोकल प्रवास हा केव्हाही वेळेची बचत होणारा असल्याकारणाने, सर्वसामान्य मुंबईकराची भिस्त ही लोकल प्रवासावर अधिक आहे.
हे ही वाचा:
बाजार समित्यांना मोदी सरकारकडून एक लाख कोटी मिळणार
मुलांना शालेय शुल्कात सूट का असू नये?
चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादकपदाचा काय संबंध आहे?
दोन लसी घेतलेल्यांसाठी लोकलप्रवास मुभा देण्यात यावी म्हणून आता प्रवासी संघटना चांगल्याच आक्रमक झालेल्या आहेत. उपनगरातून मुंबईच्या दिशेने हजारो लाखो लोकांच्या येण्याजाण्यासाठी लोकल हाच सर्वोत्तम पर्याय आहे. सध्या आता कार्यालयांमध्ये उपस्थिती सुद्धा अनिवार्य झालेली आहे. त्यामुळे रस्तामार्गे कार्यालय गाठणे अतिशय जिकीरीचे झालेले आहे. राजकीय दौरे आणि आंदोलने सुरू आहेत मग लोकल प्रवास अजूनही का सुरू नाही म्हणून आता सर्वसामान्य नागरिक प्रश्न विचारत आहे. अनेकांनी तर ठाकरे सरकारच्या निर्बंधरुपी नियमांना केराची टोपली दाखवत रेल्वे प्रवास करायलाही सुरुवात केली.
किमान लसीकरण झालेल्यांना लोकलप्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणी आता मोठ्या प्रमाणावर जोर धरू लागलेली आहे. क्यूआरकोडच्या माध्यमातून ठाकरे सरकारने ही परवानगी द्यावी अशी मागणी आता प्रवासी संघटना करत आहेत. सामान्य मुंबईकर लोकल प्रवासावर असलेल्या निर्बंधामुळे पुरता त्रासला गेलेला आहे. त्यामुळेच आता आंदोलन करत रस्त्यावर उतरल्याशिवाय काहीच पर्याय उरलेला नाही.