राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंधांसंबंधित महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बुधवार ५ जानेवारी रोजी दिली आहे. राज्यतील विद्यापीठ, महाविद्यालयातील परीक्षा या १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन घेण्यात येणार असल्याचे देखील ते या वेळी म्हणाले. हा निर्णय सर्व अभिमत, खासगी विद्यापीठांना लागू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील कोरोना आणि ओमायक्रोन रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नुकतेच मुंबईतील शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने जाहीर केला होता. त्यामुळे महाविद्यालयेही आता बंद करण्याची घोषणा होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती.
हे ही वाचा:
शेअर बाजारात सध्या स्टील शेअर्सना पसंती
तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा… मोदींची खोचक टीका
महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला मुख्यमंत्री?
अमिताभ, राज ठाकरे यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव…
राज्यातील अकृषी विद्यापीठे, अभिमत, स्वयं अर्थसहाय्यीक विद्यापीठे, तंत्रनिकेतन, शैक्षणिक संस्था १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार, तसेच पूर्वीप्रमाणे ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार आणि परीक्षा ही ऑनलाईन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक महाविद्यालयांना आणि विद्यापीठाला हेल्पलाईन सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.