गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात बंद असलेली महाविद्यालये आजपासून पुन्हा सुरु होणार आहेत. पण ही महाविद्यालये सुरू होत असली तरी त्याविषयी संभ्रमही कायम आहे.
राज्यातील निर्बंध शिथिल करताना राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे राज्यातल्या शाळांपाठोपाठ आता महाविद्यालये आणि विद्यापीठे देखील सुरु होत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येणे शक्य होत नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाकडून विशेष शिक्षणाची व्यवस्था करण्यात यावी, असेही सांगण्यात आले आहे. मात्र, याबाबतीत अजूनही संभ्रमच आहे. पूर्ण लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश नसल्यामुळे शिक्षक महाविद्यालयात असताना त्यांचे वर्ग कसे घेणार, याबातीत अजूनही स्पष्टता दिलेली नाही.
महाविद्यालयातील कँटिनची व्यवस्था मुलांसाठी खुली ठेवण्यात आलेली नाही. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. हॉटेल्स, रेस्तराँ उघडली आहेत, रात्री उशिरापर्यंत ती सुरू आहेत पण महाविद्यालयातील कँटिन मात्र का बंद ठेवण्यात आली आहेत, हे विद्यार्थ्यांना कळत नाही. वर्गात बसलेले विद्यार्थी कँटिनमध्ये गेल्यावर कोरोनाची त्यांनी कोणती भीती असेल, असे सवाल उपस्थित केले जात आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांमध्ये सर्व नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठात प्रवेश करण्यासाठी विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक असणार आहे. महाविद्यालये ५० टक्के उपस्थितीत सुरू केली जाणार आहेत. लसीकरण पूर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयातच लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचे पूर्ण लसीकरण झालेले असणे बंधनकारक आहे, असे नियमावलीत सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा:
‘कॅप्टन’ काढणार स्वतःचा नवा ‘संघ’
जयंत पाटलांच्या शिक्षण संस्थेने सरकारचीच जमीन सरकारला देऊन तीसपट मोबदला मिळवला!
काँग्रेसच्या नव्या नियुक्त्यांत पटोले समर्थकांचे ‘लोंढे’; सचिन सावंतांचा नाराजीनामा
‘आर्यन खानची पाठराखण करणे ही लाजिरवाणी बाब’
राज्यातील उपहारगृहे आता खुली करण्यात आली असताना महाविद्यालयातील कॅन्टीन मात्र बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच वसतिगृहांबद्दलही काही निर्णय घेण्यात आलेला नाही. मुंबई- पुण्यासारख्या शहरांमधील महाविद्यालयांमध्ये अनेक विद्यार्थी हे दुसऱ्या शहरांमधून शिक्षणासाठी येतात. वसतिगृहे सुरू न झाल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना अडचणी होणार आहेत.
कोरोनाची नियमावली पाळून आणि टप्प्याटप्प्याने वसतिगृह सुरु करण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान मुंबई विद्यापीठाने आपल्या अंतर्गत येणारे महाविद्यालय सुरू करण्यासाठी परिपत्रक जारी केले आहे. महाविद्यालय सुरू होणार असले तरी वसतिगृह खुले करण्याबाबतीत अजूनही संभ्रम कायम आहे. मुंबई विद्यापीठाच्या नियमावलीनुसार ५० टक्के आसन क्षमतेने स्थानिक प्राधिकरणाच्या आणि विद्यापिठाच्या सहमतीने वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. १८ वर्षांवरील विद्यार्थी ज्यांचे पूर्ण लसीकरण झालेले आहे त्यांनाच परवानगी देण्यात येणार आहे.
राज्यातील काही विद्यापीठांनी महाविद्यालये दिवाळीनंतर सुरू करण्यात येतील असे सांगितले आहे. सध्या सुरू असणाऱ्या परीक्षा आणि येणारी दिवाळी या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.