उत्तर भारतात कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. गुरुवारी थंडीची बिकट परिस्थिती जाणवली आणि कमाल तापमान १२ ते १८ अंश सेल्सिअसवर होते. हवामान विभागानुसार, हे तापमान सर्वसामान्य तापमानापेक्षा कमी आहे. दिवसभर सातत्याने ढगाळ वातावरण राहिल्याने आणि सूर्य ढगांआड लपल्याने पंजाब, हरयाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तरी मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये कमाल तापमान दोन ते सहा अंश सेल्सिअस खाली घसरले होते, असे हवामान विभागाने सांगितले.
भारतीय हवामान विभागानुसार, कमाल तापमान हवामान जेव्हा सर्वसाधारण तापमानाच्या ४.५ ते ६.४ अंश सेल्सिअस खाली घसरते तेव्हा थंड दिवस घोषित केला जातो. दिल्लीच्या सफदरजंग गुरुवारी कमाल तापमान १२.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. जे सर्वसामान्य तापमानाच्या ६.८ अंश खाली होते. हरयाणाच्या हिसारमध्ये कमाल तापमान १२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. पंजाबच्या पटियालामध्ये तापमान १०.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. तर, मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये कमाल तापमान १६.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सर्वसामान्य तापमानाच्या ७.३ अंश कमी आहे.
पुढील आठवड्यात दिलासा मिळण्याची शक्यता
पुढील आठवड्यात उष्ण व दक्षिण-पश्चिमी वाऱ्यांमुळे रविवारनंतर किमान आणि कमाल तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, दक्षिण हरियाणा आणि दक्षिण उत्तर प्रदेशच्या काही भागांत पुढील आठवड्याच्या सुरुवातीला हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर, पंजाब, हरयाणा आणि उत्तर राजस्थानमध्ये दाट धुके पडण्याचा अंदाज आहे.
हे ही वाचा:
राज्यसभेच्या ६८ खासदारांचा सन २०२४ मध्ये कार्यकाळ संपणार
पश्चिम आशियाई देश- अमेरिकेदरम्यान युद्धाचे सावट
भारत – दक्षिण आफ्रिका दुसरी कसोटी दुसऱ्याच दिवशी संपली
आव्हाड तुमचा रामाशी संबंध काय?
दाट धुक्यामुळे रेल्वे-विमान वाहतुकीवर परिणाम
दाट धुक्यामुळे कमी दृश्यमानता असल्याने गुरुवारी दिल्लीला जाणाऱ्या २६ रेल्वेगाड्या उशिराने धावत होत्या. याशिवाय, विमानवाहतुकीवरही परिणाम झाला. उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांना त्यांचा जम्मू शहरातील नियोजित कार्यक्रम रद्द करावा लागला. खराब हवामानामुळे त्यांचे विमान जम्मू विमानतळावर पोहोचू न शकल्यामुळे ते पठाणकोटच्या दिशेने वळवावे लागले.