जम्मू आणि काश्मीरमधील खोऱ्यामध्ये काही दिवसांपासून तणाव असून या भागात जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि सैन्य दलाकडून शोधमोहीम राबविली जात आहे. दरम्यानच्या काळात या राज्यातील काही भागात दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक देखील झाल्या. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका चकमकीत लष्कराचे तीन जवान शहीद झाले होते. आता केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF-Central Reserve Police Force) कोब्रा कमांडोचे पथक तैनात केले आहे.
कुपवाडा जिल्ह्यात सीआरपीएफच्या कोब्रा कमांडोचे पथक तैनात करण्यात आले आहे. कोब्रा पथकाला पूर्व आणि मध्य भागातून हटवून जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात करण्यात आले आहे. कोब्रा कमांडोच्या पहिल्या पथकाने जम्मू आणि काश्मीर खोऱ्यांमधील जंगलामध्ये प्रशिक्षण पूर्ण केलं असून त्यानंतर या पथकाला कुपवाडा जिल्ह्यात तैनात करण्यात आलं आहे.
माओवाद्यांशी लढण्यासाठी २००९ मध्ये कमांडो बटालियन फॉर रेजोल्यूट अॅक्शन म्हणजेच कोब्रा या स्वतंत्र दलाची निर्मिती करण्यात आली होती. निर्मितीनंतर पहिल्यांदा कोब्रा पथकाला पूर्व आणि मध्य भागातून हटवून जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात करण्यात आलं आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार आणि झारखंडमध्ये नक्षलवादी कारवाया काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. त्यामुळे तेथील कोब्रा कमांडोच्या काही पथकांना काही काळासाठी हटवण्यात आलं आहे. या पथकांना जम्मू आणि काश्मीर येथे तैनात करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले होते. कोब्रा कमांडोच्या या पथकांनी सहा महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. मात्र, त्यांचा अद्याप कोणत्याही मोहिमेत वापर करण्यात आलेला नाही.
सीआरपीएफ कोब्रा कमांडोचं पथक एप्रिल महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये पाठवण्यात आले होते. काश्मीरमध्ये सीआरपीएफ जवान दहशतवादविरोधी कारवाया तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सीआरपीएफ जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय सैन्य दलासोबत मिळून काम करत आहे.
हे ही वाचा:
बेस्ट बसमध्ये पैसे विसरणारे प्रवासी वाढले; चार वर्षांत ८ हजार छत्र्याही लोक विसरले
भारताने आठव्यांदा जिंकला आशिया चषक
‘इंडी’ आघाडी पत्रकारांवरील बहिष्कार मागे घेणार?
संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने महाराष्ट्रातील सात कलावंतांना सन्मान
देशातील अंतर्गत नक्षलवादी कारवायांमध्ये वाढ झाल्याने भारताची अंतर्गत सुरक्षा धोक्यात आली होती, त्यावेळी कोब्रा कमांडो दलाची स्थापना करण्यात आली. गेल्या काही वर्षात कोब्रा कमांडोच्या पथकांनी अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यांच्या मोहिमांमुळे नक्षलवादी हिंसाचार कमी झाला आहे. जंगल आणि डोंगराळ भागात दहशतवाद्यांशी मुकाबला करण्यात कोब्रा कमांडो तरबेज आहेत.