उत्तराखंडातील उत्तरकाशीत ऐन दिवाळीत भूस्खलन होऊन ४१ मजूर एका बोगद्यात अडकून पडले आहेत. या मजुरांना बोगद्याच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या मजुरांना बाहेर काढण्यासाठी आणलेली ऑगर मशिनही कुचकामी ठरत असून आता या बचावकार्यासाठी कोल इंडियाची मदत घेतली जाणार आहे.
मजुरांच्या सुटकेसाठी व्हर्टिकल ड्रिलिंग (उभं खोदकाम) सुरू असून त्यासाठी कोल इंडिया लिमिटेड नागपूरचे पथक सिलक्यारा येथे दाखल झाले आहे. व्हर्टिकल ड्रीलिंगनंतर मजुरांना वरून बाहेर काढण्याच्या कॅप्सूलचे काम नागपूरवरून आलेली कोल इंडियाचे पथक करणार आहे. यात चार तंत्रज्ञांचा समावेश आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून बचाकार्याचे प्रयत्न सुरू असून रेस्क्यू पथकाला सावकाश थांबून थांबून अंदाज घेत काम करावे लागत आहे. देशातील अन्य भागातून पाठविलेली यंत्रसामग्री रस्ते मार्गाने सिलक्यारा येथे पोहचण्यास पावसामुळे प्रचंड विलंब होत आहे. त्यामुळे आता आडव्या मार्गाने पाईप टाकण्यात अडथळे निर्माण होत आहेत. म्हणून उभ्या मार्गाने डोंगरावरून व्हर्टिकल ड्रिलिंगही सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे मजुरांना बाहेर येण्यासाठी आणखी काही दिवस लागतील असे म्हटले जात आहे.
हे ही वाचा:
खलिस्तानी दहशतवादी अर्शदीपच्या दोन शूटर्सला ठोकल्या बेड्या
लग्न परदेशात कशाला, इथेच करा आत्मनिर्भर भारतासाठी!
एस. जयशंकर म्हणाले, ‘भारताला स्वतःच्या नरेटिव्हची गरज’
पाकिस्तान झाला बेहाल; नागरिकांना अन्न मिळणंही झालंय कठीण!
चारधाम यात्रेसाठी बारमाही रस्ता बनविण्याच्या योजनेतील सिलक्यारा बोगद्यात ४१ मजूर गेल्या जवळपास १५ दिवसांपासून अडकून पडले आहेत. या मजुरांचा जीवन- मरणाशी संघर्ष सुरू आहे. या मजुरांना काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मजुरांची प्रकृती ठीक असून त्यांना वेळोवेळी जेवण इतर वस्तू पुरविल्या जात आहेत.