महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. गुरुवार, २ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून घरी जाण्यासाठी डॉक्टरांनी परवानगी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल होते. मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी ते रुग्णालयात दाखल झाले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मणक्याचा त्रास जाणवत होता. यावर उपाय योजना म्हणून शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. मुंबईतील एच एन रिलायन्स हॉस्पिटल येथे ही शस्त्रक्रिया करण्यात आली डॉक्टर शेखर भोजराज आणि डॉक्टर अजित देसाई या दोघांनी मिळून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. १२ नोव्हेंबर रोजी ही शस्त्रक्रिया पार पडली. उद्धव ठाकरे यांच्या सरवाईकल स्पाईन संदर्भात ही शस्त्रक्रिया होती.
हे ही वाचा:
उत्तर कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन
ममता बॅनर्जी यांनी केला राष्ट्रगीताचा अपमान!
…आणि त्यावेळी अर्धवट बुद्धिवादी मूग गिळून गप्प होते
ममता बॅनर्जींचे स्वागत आणि भाजपचे मुख्यमंत्री आले तर टीका
शस्त्रक्रियेच्या निमित्ताने तब्बल २२ दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गिरगाव येथील एच एन रिलायन्स रूग्णालयात होते. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आले होते. या वेळी त्यांची औषधे, तब्येत, पथ्यपाणी या सर्वांचीच काळजी घेण्यात आली. गुरुवारी मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज देण्याअगोदर आवश्यक त्या सर्व चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांचे अहवाल सकारात्मक आल्यावरच मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आपल्या वडिलांना घेऊन जाण्यासाठी आले होते. दरम्यान या काळात रुग्णालयातून मुख्यमंत्री ठाकरे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या बैठकांना उपस्थित राहताना दिसले.