मुख्यमंत्र्यांच्या भाषणात रेल्वेनिर्णयाचा एकच डोस, बाकी ओस

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात रेल्वेनिर्णयाचा एकच डोस, बाकी ओस

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवार ८ ऑगस्ट रोजी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, राज्यात ओढवलेली नैसर्गिक आपत्ती तसेच कोविड परिस्थिती या सर्व गोष्टींवर भाष्य केले. यावेळी देखील सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास सुरू करण्याचा निर्णय सोडता इतर कोणत्याही विषयात मुख्यमंत्र्यांनी ठोस असे काहीच जाहीर केले नाही.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सुरुवातीला ठाकरे सरकारने सर्व जबाबदारी केंद्र सरकारवर ढकलली होती. पण आता केंद्र सरकार आरक्षणाचे अधिकार राज्य सरकारांना देण्याच्या तयारीत आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा नुसता अधिकार देऊन काहीही होणार नाही, केंद्र सरकारने ५० टक्क्यांची मर्यादाही काढावी, असे म्हणत पुन्हा जबाबदारीतून हात झटकत केंद्राकडे मुद्दा टोलवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी या संवादात महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यात सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती विषयी भाष्य केले. सरकारने दिलेल्या मदतीचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. पण त्याचवेळी तातडीची मदत नेमकी किती दिली यावर भाष्य करणे मात्र टाळले. तर कोविडची तिसरी लाट आली तर राज्य सरकार त्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यासाठी आरोग्य व्यवस्थेत आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या आहेत असे सांगत त्यांनी त्यासंबंधीची आकडेवारी दिली.

हे ही वाचा:

केवळ दोन डोस घेतलेल्यांनीच मॉलमध्ये जा…..वाचा सविस्तर!!

लक्ष विमान प्रवाशांची संख्या झेपावण्याकडे

सणांचा, व्रतांचा ‘राजा’ आला…

१५ ऑगस्टपासून मिळणार लोकल प्रवासाचे स्वातंत्र्य

या संपूर्ण फेसबुक लाईव्ह मधला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय कोणता असेल तर तो सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल सुरू करण्याचा. लसीचे दोन्ही डोस घेऊन पूर्ण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात येत आहे. पण त्यासाठी नागरिकांना सरकारच्या एका ॲपवर नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. अशा नोंदणीकृत नागरिकांना लोकलचा पास देण्यात येईल. तर ज्यांच्याकडे मोबाईल फोन्स नाहीत अशा नागरिकांसाठी ऑफलाईन रजिस्ट्रेशनची सुविधाही असणार आहे. तर याचवेळी हॉटेल्स, मंदिरे, देवस्थाने या संदर्भातील निर्णय उद्या टास्क फोर्सच्या बैठकीत घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पण या सगळ्यात त्यांना आपण किती लोकप्रिय मुख्यमंत्री आहोत हे सांगण्याचा मोह उद्धव ठाकरेंना आवरला नाही. एका सर्वेचा हवाला देत आपण किती लोकप्रिय मुख्यमंत्री ठरलो हे सांगताना त्याचे श्रेय महाराष्ट्राच्या जनतेला दिले. पण आपल्या संवादाचा समारोप करताना लोकमान्य टिळकांच्या थाटात ‘कोविड पासून मुक्तता मिळणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ असे ते म्हणाले.

Exit mobile version