मागाठाणे ते गोरेगाव हा लोखंडवालामधून जाणारा १२० फुटी डीपी रोड किती संपूर्ण पश्चिम उपनगरासाठी किती महत्वाचा आणि त्याहीपेक्षा तो किती आवश्यक आहे. याबद्दलची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाणून घेतली. भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना हा रस्ता होणे हे सामान्य नागरिकांच्या दृष्टीने किती हिताचे आहे. लोकांची वाहतूक कोंडीतून सुटका होऊन वेळ वाचणार आहे. तसेच यामध्ये बाधित होणाऱ्या घरांचे पुनर्वसन याच भागात करता येऊ शकते. तशा सदनिका तयार आहेत, याची माहिती दिली. त्यामुळे हा रस्ता होण्यासाठी काहीच अडचण असण्याचे कारण नाही. लोखंडवाला, म्हाडा येथील हजारो नागरिकांची तशी मागणी आहे. लोखंडवाला म्हाडा रेसिडेंट १२० फूट डीपी रोड ॲक्शन कमिटीच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांना तसे निवेदनही देण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांनी अत्यंत सकरात्मक दृष्टीकोनातून हा विषय समजून घेतला असून लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करणार असल्याचे आश्वासनही दिले.
हेही वाचा..
संसद घुसखोरी प्रकरण: नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंगनंतर प्रकरणाच्या मास्टरमाईंडचे नाव समोर
वडिलांचे नाव नीट न लिहिता येणारे वडिलांचा वारसा कसा चालवणार?
आज मणिपूरपासून सुरू होणार काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा
५५ वर्षांचे संबंध संपवत मिलिंद देवरांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
यावेळी बोलताना आमदार भातखळकर म्हणाले, मागठाणे ते गोरेगाव हा डीपी रोड १९९१ च्या विकास आराखड्यातील आहे. २०१६ मध्ये मुंबईचा जो मोबिलिटी प्लॅन करण्यात आला त्यात या रस्त्याचा प्राधान्याने समावेश करण्यात आला. जे पाच व्हायटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जाहीर करण्यात आले त्यातही हा प्रकल्प आहे. यापूर्वी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे बैठक झाली आहे. तत्कालीन मुख्य अभियंता यांची समिती नेमण्यात आली. या समितीने याबाबत अलाइनमेंट होणार नाही असा अहवाल दिला आहे. येथील महिंद्र कंपनीची जागासुद्धा हस्तांतरित झाली आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने व्हावा, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.
हा रस्ता तयार झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होणार आहे. लोकांचा वेळ वाचणार आहे. बाधित घरांच्या पुनर्वसनासाठी आप्पापाडा, कांदिवली पश्चिम येथे सदनिका तयार आहेत. या भागातील लोकांना याच परिसरात घरे मिळाली तर तोही प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्ण करण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालून संबंधित विभागाला तसे निर्देश द्यावेत, अशी मागणी आ. भातखळकर यांनी केली. यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते. लोखंडवाला म्हाडा रेसिडेंट १२० फूट डीपी रोड ॲक्शन कमिटीच्या वतीने आमदार भातखळकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.