अवकाळी पावसामुळे राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांतील पिकांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील ही परिस्थिती पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी धुळवडीच्या दिवशी सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे.
सरकार संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व पंचनामे करावेत असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.हवामान विभागाच्या माहितीनुसार ६ ते ८ मार्च दरम्यान, मध्य आणि पश्चिम भारतात वादळासह पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाण्यासह उत्तर-मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असल्याने बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
अकोला, वाशिम, अमरावतीत गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, मराठवाड्यासह काही भागात गारपीट होण्याचाही इशारा देण्यात आला आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत. सध्या कांदा, गहू, ज्वारी पिकांची काढणी सुरु असताना अचानक अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.गारपीट झाल्याने गहू, ज्वारी, हरभरा, उन्हाळी बाजरी, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गारा पडल्याने शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे.
हे ही वाचा :
वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी
असा नशा करण्यापेक्षा भक्तीचा, संगीताचा, कामाचा नशा करावा
बिग बी म्हणाले,तुमच्या प्रार्थनेने मी बरा होत आहे
या जिल्ह्यांना अवकाळी फटका
ठाणे, पालघरसह राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशिम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. हवामानात झालेला हा बदल पाहता रब्बी पिकं हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.