रायगडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस; किल्ल्याच्या पायऱ्यांना धबधब्याचं स्वरुप

सोमवार, ८ जुलैपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद

रायगडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस; किल्ल्याच्या पायऱ्यांना धबधब्याचं स्वरुप

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रविवार रात्रीपासून पावसाने मुंबई आणि उपनगरांमध्ये हाहाःकार माजवला असून जनजीवन यामुळे विस्कळीत झाले आहे. अशातच किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश पाऊस पडला असून याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मुसळधार पडणारा पाऊस आणि ढगफुटी सदृश परिस्थितीमुळे किल्ले रायगडाच्या पायऱ्यांना धबधब्याचं स्वरुप प्राप्त झालं होतं. किल्ल्याच्या पायऱ्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना दिसत असून त्यात काही पर्यटकसुद्धा अडकल्याचं दिसून येत आहे. बुरूज आणि कड्यांवरूनही धबधब्यासारखं पाणी वाहतं आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडावर जाणाऱ्या वाटा बंद केल्या आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. गडावर चालत जाणाऱ्या मार्गावर बॅरीकेट्स लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पोलिसांचा २४ तास बंदोबस्त राहणार आहे. गडावरील रोपवेची सेवाही बंद करण्यात आली आहे. शिवाय सोमवार, ८ जुलैपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.

रागयड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यात सरासरी ७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर, माथेरान येथे सर्वाधिक २२० मिलीमीटर पाऊस पडला आहे. दुसरीकडे कोकणातही पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने आठवडाभराच्या विश्रांतीनंतर चांगलंच झोडपून काढलं आहे. पावसामुळे राजापूर, लांजा, रत्नागिरी, चिपळूण, खेड येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

हे ही वाचा:

मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे कंट्रोल रूममध्ये

पंतप्रधान मोदी रशिया, ऑस्ट्रिया दौऱ्यासाठी रवाना; रशियातील भारतीयांशी साधणार संवाद

इस्रायलचा गाझातील शाळेवर हवाई हल्ला, १६ जणांचा मृत्यू !

पावसाने मुंबईला झोडपलं; रेल्वेसेवा खोळंबली, रस्ते वाहतूक धीम्या गतीने

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. गावांमध्येही पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः कंट्रोल रूमला भेट देत राज्यातील आणि मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच योग्य त्या सूचना देत प्रशासनाला उपाययोजना करण्यास सांगितले आहे.

Exit mobile version