केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन अडीचशे लोकांनी आपले प्राण गमावले असून या भागात अजूनही शोधकार्य आणि बचावकार्य सुरू आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना आता उत्तरेकडील राज्यांमध्ये देखील पावसाने हाहाःकार माजवल्याची माहिती आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा प्रकोप पाहायला मिळत असून ढगफुटी झाली आहे.
सतत पाडणाऱ्या पावसामुळे नद्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शिमल्यापासून साधारण १०० किमी दूर असलेल्या रामपूरच्या झाकडी आणि मंडी जिल्ह्यातील राजवन गावावर प्रचंड ढगफुटी झाली आहे. या पावसामुळे गावांमध्ये अचानक पूर आला आणि या पाण्यात सुमारे ३६ जण वाहून गेल्याची माहिती आहे. रामपूरचे उपायुक्त अनुपम कश्यप यांनी सांगितले की, “या घटनेची माहिती मिळताच तातडीने एसडीआरएफची टीम रवाना करण्यात आली आहे. तसेच पोलीस, रेस्क्यू टीम देखील पोहोचली आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार ढगफुटीमध्ये ३६ लोक बेपत्ता झाले आहेत.”
तर, रामपूरचे एसडीएम निशांत तोमर यांना रस्ते बंद असल्याने तुकडीसह सर्व यंत्रणा घेऊन दोन किमी पायपीट करावी लागली आहे. मंडीच्या द्रंग विधानसभा क्षेत्रातील राजवन गावावरही ढगफुटी झाली आहे. यात एकाचा मृत्यू झाला असून अनेक घरे पाण्याच्या वेगामुळे वाहून गेली आहेत. यामध्ये ११ पेक्षा अधिक लोक बेपत्ता झाल्याचे सांगितले जात आहे. मोबाईल सेवा ठप्प झाली आहे. तसेच रस्ते देखील उखडले गेले आहेत त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.
#WATCH | Himachal Pradesh | The SDRF team at the spot in Shimla for the search and rescue operation where 36 people are missing and 2 bodies have been recovered so far after a cloudburst in the Samej Khad of Rampur area in Shimla district.
(Visual source – CMO) pic.twitter.com/WqF6vDk4Tx
— ANI (@ANI) August 1, 2024
कुल्लूच्या मलाणा भागातील एक व्हिडीओ व्हायरल होत असून पावसाचे रौद्र रूप यातून दिसत आहे. कुल्लूच्या मलाणा भागात रात्री उशिरा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पार्वती नदीला पूर आला असून त्यामध्ये किनारी भागात असलेली अनेक घरे, गाड्या वाहून गेल्या आहेत. व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, एक चार मजली इमारत काही सेकंदांच्या आत पार्वती नदीमध्ये सामावून कोसळली आहे. कुल्लू जिल्ह्यातील बियास आणि पार्वती नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे.
हे ही वाचा:
वायनाड भूस्खलनात २५६ जणांचा मृत्यू; १९० नागरिक अद्यापही बेपत्ता
‘वहाबी अतिरेकी दहशतवादी संघटनां’वर राष्ट्रहितासाठी बंदी घाला
वायनाड दुर्घटनेवर अमित शहा म्हणाले, ‘इशारा देऊन देखील केरळ सरकारचे दुर्लक्ष’
हिमाचल प्रदेशात पुढच्या ३६ तासांमध्ये १० जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. बिलासपुर, चंबा, हमीरपुर, कांगड़ा, कुल्लू, मंडी, शिमला, सिरमौर, सोलन आणि ऊना येथे गुरुवार आणि शुक्रवारी दिवसभर पाऊस कोसळण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेश फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना खबरदारीचा इशारा दिला आहे.