केईएम रुग्णालयात कोवॅवॅक्सच्या क्लिनिकल ट्रायलला सुरूवात

केईएम रुग्णालयात कोवॅवॅक्सच्या क्लिनिकल ट्रायलला सुरूवात

भारत कोविडचा सामना मोठ्या हिंमतीने करत असताना भारतातील लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली आहे. भारतातील लसीकरण मोहिम कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींच्या आधारावर सुरू झाली असून, त्यात आता मॉडर्ना आणि स्पुतनिक लसीची देखील भर पडली आहे. त्यानंतर लवकरच कोवॅवॅक्स लसीच्या क्लिनीकल ट्रायलला केईएम रुग्णालयात प्रारंभ झाला आहे. ही चाचणी १८ वर्षांवरील रुग्णांमध्ये घेतली जाणार आहे. त्यानंतर या लसीला मान्यता मिळू शकेल.

कोविशिल्ड प्रमाणेच कोवॅवॅक्स लसीचे उत्पादन देखील पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियामध्ये केले जाते. या लसीचे उत्पादन नोवावॅक्स इन्क. या मूळ अमेरिकन संस्थेने केले आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या निष्कर्षानुसार ही लस मध्यम आणि तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये देखील १०० टक्के प्रभावी ठरते. या लसीची एकूण परिणामकारकता ९०.४ टक्के आहे.

हे ही वाचा:

शरद पवार हे साडेतीन जिल्ह्याचे स्वामी

ठाकरे सरकारमध्ये पब,डिस्को,बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात

पंतप्रधान मोदींनी बोलावली संरक्षण विषयक बैठक

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा ठरल्या

याबद्दल केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले की, कोवॅवॅक्स लसीच्या १८ वर्षांवरील नागरिकांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला राष्ट्रीय चाचणी कार्यक्रमा अंतर्गत सुरूवात झाली आहे. देशमुख यांनी गोपनीयतेच्या कारणास्तव याबाबत अधिक काही बोलण्यास नकार दिला.

या लसीची चाचणी देशातील २० रुग्णालयांतून १६,००० लोकांवर करण्यात येणार आहे. यापैकी ५ रुग्णालये महाराष्ट्रातून निवडण्यात आली आहे. केईएम रुग्णालयाव्यतिरिक्त नागपूरच्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आणि पुण्यातील डॉ. डी वाय पाटील मेडिकल कॉलेज, नोबेल हॉस्पिटल आणि सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या रुग्णालयांचा समावेश आहे.

या चाचणीत सहभागी होणाऱ्यांना लसीचे दोन डोस दिले जाणार आहेत. दोन लसमात्रांमधील अंतर २२ दिवसांचे ठेवण्यात आले आहे. त्याबरोबरच याबद्दल सहभाग घेणाऱ्यांकडून लिखीत आश्वासन देखील घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या लसीची लहान मुलांवर चाचणी घेण्यासाठी सिरम लवकरच डीसीजीआयकडे अर्ज करणार आहे.

Exit mobile version