अयोध्येतील मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी राम मंदिरात पाणीगळती होत असल्याचा दावा केला होता. मात्र राम मंदिराच्या संरचनेत किंवा बांधकामात कोणतीही त्रुटी नसून सध्या सुरू असलेल्या राम मंदिराच्या बांधकामामुळे ही पाणीगळती होत आहे, असे राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सोमवारी स्पष्ट केले. मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी केलेल्या दाव्यांवर आधारित अनेक सोशल मीडिया यूजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिशाभूल करणारे दावे आणि आरोप केले आहेत.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मिश्रा म्हणाले, ‘मी अयोध्येत आहे. पहिल्या मजल्यावरून पावसाचे पाणी खाली पडताना दिसत आहे. हे अपेक्षित आहे कारण दुसरा मजल्याचे काम शिखर पूर्ण झाल्यामुळे गुरू मंडप खुला झाला आहे. पहिल्या मजल्यावरील काम सुरू असल्याने मला काही गळतीही दिसली. परंतु काम पूर्ण झाल्यावर ती बंद केली जाईल.’
मिश्रा यांनी गर्भगृहातील ड्रेनेज समस्यांबाबतची चिंताही फेटाळून लावली. मंडपात पाणी सोडण्यासाठी योग्य उतार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मंडपातील पाणी हाताने पुसले जाते. तसेच, भाविक जल अभिषेक करत नाहीत, असेही ते म्हणाले.
‘गर्भगृहात कोणतीही मलनिःसारण व्यवस्था नाही. अन्य मंडपात पाणी निघून जावे, यासाठी उतार आहे. तसेच, गर्भगृहात पाणी मानवी मदतीने पुसले जाते. शिवाय, भाविक देवतेला अभिषेक करत नाहीत. त्यामुळे या मंदिराची संरचना किंवा बांधकामात कोणतीही त्रुटी नाही. जे मंडप उघडे आहेत तिथे पावसाचे पाणी पडू शकते. त्यावर वाद झाला होता. परंतु नगर स्थापत्यशास्त्राच्या नियमांनुसार ते खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
हे ही वाचा:
‘बंगाल सरकारने खोटे वृत्त पसरवले’
भारत टी-२० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत, ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपच्या बाहेर जाणार?
केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची राज्यसभेतील सभागृह नेतेपदी नियुक्ती!
भाजपामधल्या ‘खाऊं’ना भाऊंची भीती!
तत्पूर्वी, राममंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी पहिल्या पावसाळ्यातच मंदिराच्या गर्भगृहात आणि इतर भागांत पाणीगळती झाल्याचे म्हटले होते. पहिल्या पावसातच राम लल्लाची मूर्ती असलेल्या गर्भगृहाचे छत गळू लागले. या समस्येकडे लक्ष दिले पाहिजे आणि ते कशामुळे झाले, हे शोधले पाहिजे, असेही ते म्हणाले. मंदिरातून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही. पावसाचा जोर वाढल्यास प्रार्थना सेवा विस्कळीत होऊ शकते, असेही ते म्हणाले होते.