२६ जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत घडलेल्या हिंसाचाराची साऱ्या देशभर निंदा होत असताना आता दिल्लीतील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी नागरिक एकवटले आहेत. या सोबतच दिल्लीची सिंघू सीमा खाली करण्यात यावी अशी मागणी या नागरिकांनी केली आहे. दोन महिन्यापासून आपल्या परिसरात सुरु असलेले आंदोलन सहन करणाऱ्या नागरिकांचाही आता संयम संपल्याचे या घटनेतून दिसून येत आहे.
केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यापेक्षा अधिक काळ दिल्लीत आंदोलन सुरु आहे. हे आंदोलक दिल्लीच्या विविध सीमांवर ठिय्या देऊन बसले आहेत. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅली आयोजित केली गेली पण या रॅलीच्या नावाखाली धुडगूस घालून हिंसेचा नंगानाच करण्यात आला. साऱ्या देशातून या हिंसेविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असतानाच आता दिल्लीतील सिंघू सीमेच्या परिसरात राहणारे स्थानिक रहिवासी रस्त्यावर उतरले आहेत. “तिरंगे का अपमान नही सहेगा हिंदुस्तान” अशा घोषणा देत हे नागरिक हिंसाचाराच्या विरोधात एकवटले आहेत. सिंघू सीमेवर एकवटलेल्या आंदोलकांनी सीमा खाली करावी अशीही मागणी या नागरिकांनी केली आहे.
#WATCH | Delhi: Group of people claiming to be locals gather at Singhu border demanding that the area be vacated.
Farmers have been camping at the site as part of their protest against #FarmLaws. pic.twitter.com/7jCjY0ME9Z
— ANI (@ANI) January 28, 2021
सिंघू सीमेवरील नागरिक रस्त्यावर उतरल्यामुळे आता तिथे आंदोलन विरुद्ध प्रतिआंदोलन अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.