स्थापत्य अभियांत्रिकी पदविका धारकांसाठी (Civil Engineering Diploma Holder) मोठी बातमी असून केंद्रीय लोक निर्माण विभागात म्हणजेच CPWD मध्ये थेट वर्ग-५ मध्ये नोंदणी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यापूर्वी स्थापत्य अभियांत्रिकी पदविका धारक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना केंद्रीय लोक निर्माण विभागात नोंदणी उपलब्ध नव्हती. ही सुविधा फक्त पदवी धारक स्थापत्य अभियंत्यांनाच उपलब्ध होती.
ही अडचण लक्षात घेऊन वर्धा जिल्हा कंत्राटदार कल्याण समितीचे उपाध्यक्ष प्रणव जोशी यांनी केंद्रीय लोक निर्माण विभागात स्थापत्य अभियांत्रिकी पदविका धारक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना नोंदणी मिळावी म्हणून गेल्या दोन वर्षांपासून सतत पाठपुरावा केला. दिल्ली येथे वेळोवेळी प्रशासनासमोर प्रत्यक्ष बाजू मांडून चर्चा केली. त्यानंतर दिनांक २० जुलै २०२२ रोजी केंद्रीय लोक निर्माण विभागाने स्थापत्य अभियांत्रिकी पदविका धारक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना थेट वर्ग-५ मध्ये नोंदणी सुविधा उपलब्ध झाल्याचे लेखी पत्र खासदार रामदास तडस यांच्या माध्यमातून प्राप्त झाल्याची माहिती प्रणव जोशी यांनी दिली आहे.
राष्ट्रीय पातळीवर निर्णय होणार असल्याने सुरवातीला CPWD चे अधिकारी दाद देत नव्हते, त्यांना कागदोपत्री पटवून सांगावे लागले की भारत देशातील अनेक राज्यात सद्यस्थितीत स्थापत्य अभियांत्रिकी पदविका धारक अभियंत्यांना कंत्राटदार नोंदणी देण्यात येते. याकरिता अनेक जीआर आणि सर्क्युलर सादर करण्यात आले.
वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस तसेच भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील मेंढे यांनी खंबीरपणे स्थापत्य अभियांत्रिकी पदविका धारक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या पाठीशी उभे राहून सहकार्य आणि मार्गदर्शन केल्याचे प्रणव जोशींनी सांगितले. तसेच प्रत्यक्ष CPWD मुख्यलयात बैठकी आयोजित केल्या, वेळोवेळी पत्रव्यवहार करून मदत केली आणि म्हणूनच आज हा राष्ट्रीय पातळीवर निर्णय आमच्या बाजूने लागल्याचे प्रणव जोशी यांनी सांगितले.
हे ही वाचा:
शिवसेना म्हणजे ठाकरे अँड सन्स..
तृणमूलच्या सात खासदारांसह १९ खासदारांवर निलंबनाची कारवाई
सोनिया गांधींची पुन्हा ईडी चौकशी; आंदोलन करणारे राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात
नरेंद्र मोदी तुमचे वडील नव्हते, मग त्यांचे फोटो वापरून का निवडणूक लढविली?
या नवीन निर्णयाला अनुसरून देशभरातील सर्व स्थापत्य अभियांत्रिकी पदविका धारक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी या संधीचा लाभ घेऊन केंद्रीय लोक निर्माण विभागात (CPWD) मध्ये थेट वर्ग-५ श्रेणीत कंत्राटदार म्हणून आपली नोंदणी करावी असे आवाहनही प्रणव जोशी यांनी केले आहे.