गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संसदेची सुरक्षा भेदण्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर देशातील लोकशाहीचे सर्वांत महत्त्वाचे प्रतीक असेलल्या या वास्तूची सुरक्षाव्यवस्था आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) सोपवण्यात येत आहे. आज, सोमवारपासून संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी ते स्वीकारतील. इथे आत्तापर्यंत सेवा देणाऱ्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) एक हजार ४०० जवानांना हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याजागी सीआयएसएफचे तीन हजार ३१७ हून अधिक जवान दहशतवादविरोधी आणि अन्य सुरक्षेची जबाबदारी घेणार आहेत.
सीआयएसएफचे जवान जुन्या व नव्या संसद भवनासह परिसरातील संबंधित महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेची जबाबदारीही घेतील. सीआरपीएफच्या संसद सेवा गटाने (पीडीजी) शुक्रवारीच आपले संपूर्ण कामकाज बंद केले होते. वाहने, शस्त्रे आणि कमांडो शुक्रवारीच संसद परिसराबाहेर गेले होते. ‘सीआरपीएफ’च्या कमांडरने संकुलाच्या सुरक्षेची सूत्रे ‘सीआयएसएफ’कडे सोपवली.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरांतून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकॉर्डर जप्त!
मणिपूरमध्ये दोन तास चकमक; कुकी दहशतवाद्यांपासून ७५ महिलांची सुटका
भाजपच्या उमेदवाराला आठवेळा मत; व्हिडीओतील तरुणाला उत्तर प्रदेश पोलिसांकडून अटक
देशात पाचव्या टप्प्यात ४९ जागांचे भवितव्य ठरणार; राज्यात अंतिम टप्प्याच्या मतदानासाठी रांगा
१७ मे रोजी संसदेच्या संकुलातून बाहेर पडताना ‘पीडीजी’ जवानांनी या वास्तूसोबत सेल्फी आणि छायाचित्रे काढली. सर्वोत्कृष्ट कामगिरी करूनही त्यांना ही जबाबदारी सोडावी लागत असल्याबद्दल पीडीजीचे कर्मचारी खूप दुःखी असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. याच कर्मचाऱ्यांनी सन २००१मध्ये दहशतवादी हल्ला अयशस्वी करताना असाधारण शौर्य दाखवले होते. त्या दरम्यान एका कर्मचाऱ्याला आपले प्राणही गमवावे लागले होते.
विविध प्रकारचे प्रशिक्षण
‘सीआयएसएफ’ जवानांना सामान पडताळणी, व्यक्तिगत तपासणी, स्फोटक सामग्री शोधणे आणि विल्हेवाट लावणे, दहशतवादी कृत्याला तत्काळ प्रतिसाद, अचूक नेमबाजी आणि सार्वजनिकरीत्या बोलणे आणि वागण्याचा शिष्टाचार आदींचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) दलाच्या ‘ब्लॅक कॅट’ कमांडोकडूनही त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मागील १० दिवस या जवानांना संसद परिसराची ओळख करून देण्यात आली.